प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज
By admin | Published: October 1, 2016 01:55 AM2016-10-01T01:55:19+5:302016-10-01T01:55:19+5:30
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तान सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला. तासभर चाललेल्या या बैठकीला वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. त्यांनी गृहमंत्र्यांना
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तान सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला. तासभर चाललेल्या या बैठकीला वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. त्यांनी गृहमंत्र्यांना सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली.
पाकिस्तानच्या प्रत्येक कारस्थानाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील तणाव वाढला आहे. यामुळे सीमेवर सैन्याने सतर्क राहण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षि, सुरक्षा व गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेवरील आपल्या तुकड्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जम्मू, पंजाब, राजस्थान व गुजरातच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील जवानांना गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौक्यांवरील जवानांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने सुरक्षा दलाला आदेश दिले आहेत की, सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित जागी पोहचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत करावी. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाक कलावंत म्हणजे दहशतवादी नव्हेत
भारतीय लष्कराने पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे समर्थन करतानाच अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नव्हेत. त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालण्याची भूमिका योग्य नाही, असे म्हटले आहे. ते भारतीय व्हिसाच्या आधारे इथे येतात. त्यामुळे त्यांना इथे येण्याची परवानगी मिळालेली असते. असे असताना त्यांच्यावर बंदी कशासाठी, असा सवालच सलमान खानने केला.
या वक्तव्यामुळे पुन्हा सलमान अडचणीत येण्याची शक्यता दिसत होती. त्याने या वादात पडण्याचे कारण नव्हते. स्वत:चे हे मत त्याने जाहीरपणे सांगितले नसते, तर काहीच बिघडले नसते. आता निष्कारण त्याच्याविरुद्ध वातावरण तयार होईल, असे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मंडळी व्यक्त करीत आहेत.
उरी हल्ल्यापासून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जोरात होत आहे. काहींनी पाक कलावंत असल्याने दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याचे चित्रपट प्रदर्शित होउ देणार नाही, असे स्पष्ट केले. ‘इम्पा’ संघटनेनेही पाक कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेतला आहे. जोहर यांच्या चित्रपटाला प्रदर्शनाला परवानगी मिळण्यासाठी सलमान खान ‘मनसे’ पक्षप्रमुख राज ठाकरे यांना भेटणार असल्याचेही प्रसिद्ध झाले होते.
भारतीय जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न
चुकीने सीमेपलीकडे गेलेल्या आणि पाकिस्तानात पोहचलेल्या त्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी दिली. हा मुद्दा पाकिस्तानपुढे मांडण्यात येईल.
मिलिटरी आॅपरेशनच्या महासंचालकांनी ही माहिती हॉटलाईनद्वारे पाकला दिली आहे. पाकिस्तानातील हल्ला आणि या जवानाने चुकून पार केलेली सीमा यांचा काहीही संबंध नाही, चुकीने सीमा ओलांडण्याचे प्रकार दोन्ही बाजुच्या सैनिकांकडून बऱ्याचदा होतात, असेही सैन्य दलाने स्पष्ट केले आहे. चंदू बाबूलाल चव्हाण हा सीमेपलीकडे चुकून गेल्याचे सांगण्यात येत आहे.