भारताने फेटाळला अमेरिकेचा भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव
By admin | Published: April 4, 2017 10:24 PM2017-04-04T22:24:26+5:302017-04-04T22:33:24+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निवळण्यासाठी अमेरिकेने दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावाचे वातावरण निवळण्यासाठी अमेरिकेने दिलेला मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. दहशतवादी कारवाया, सर्जिकल स्ट्राइक, नियंत्रण रेषेवरील गोळीबार यामुळे गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावपूर्ण वातावरण आहे. हे वातावरण निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रस्ताव अमेरिकेने दिला होता. स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रिया सुरू होण्यासाठी मध्यस्थी करण्यात उत्सुकता दाखवली होती.
पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या भारताच्या भूमिकेत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. पाकिस्तानसोबतची विविध मुद्यांवरील द्विपक्षीय चर्चा दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणात व्हावी अशी भारताची भूमिका आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप न करण्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती. आता मात्र त्यात बदल होत असल्याचे अमेरिकेच्या या कृतीमधून दिसत आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी निकी हेली यांनी सांगितले की, अमेरिका भार आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे चिंतीत आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रियेत सहभागी होऊन हा प्रश्न सोडवण्यास इच्छुक आहेत,
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्नामध्ये तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला भारताने नेहमीच विरोध केला आहे. तसेच अमेरिका आणि रशियासह जगातील बहुतांश देशांनी भारताची ही भूमिका मान्य केली आहे.