भारत 39 पाकिस्तानी कैद्यांची करणार सुटका
By Admin | Published: February 28, 2017 12:05 PM2017-02-28T12:05:33+5:302017-02-28T12:07:18+5:30
सर्जिकल स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्ताकडून मिळणा-या शांती प्रस्तावावर भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतातील 39 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - सर्जिकल स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्ताकडून मिळणा-या शांती प्रस्तावावर भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतीय कारागृहांमधील 39 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यातील 21 कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली असून अन्य 18 जण मासेमारीचा व्यवसाय करणारे आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने त्यांच्या कैदेत असलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारताकडे सुपूर्द केले होते. याबदल्यात 'भारताकडून पाकिस्तानी कैद्यांची सुटका केली जाईल', अशी अपेक्षा भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केली होती.
यासंदर्भात वरिष्ठ अधिका-याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आम्ही पाकिस्तानी कैद्यांची ओळख पटवण्यासंदर्भात पाकिस्तान सरकारला माहिती दिली होती. त्यांनीही हे कैदी पाकिस्तानी असल्याची पुष्टी दिली आहे. या कैद्यांची 1 मार्चपर्यंत सुटका होईल'.
जमात-उत-दावा या संघटनेचे प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर भारताने आपली सावध प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
दरम्यान पाकिस्तानसोबत पुन्हा संवाद प्रक्रिया सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे, असे केंद्र सरकारला वाटत असले तरी सध्या दोन्ही देशांमधील बोलणी पूर्णतः बंद आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी समूहांविरोधात कठोरातील कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत बातचित होणं अशक्य आहे, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगत आपली भूमिका कायम ठेवली आहे.