CoronaVirus Update गेल्या ६ महिन्यांनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट
By देवेश फडके | Published: January 12, 2021 01:33 PM2021-01-12T13:33:00+5:302021-01-12T13:35:22+5:30
जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे.
नवी दिल्ली : कोरोना संकट नियंत्रणात येत नसले, तरी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ५८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने दगावणाऱ्यांचा आकडा ०१ लाख ५१ हजार ३२७ वर पोहोचला आहे. तर, देशात १२ हजार ५८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आतापर्यंत देशाभरातील कोरोना रुग्णांची संख्या ०१ कोटी ०४ लाख ७९ हजार १७९ वर पोहोचली आहे.
India reports 12,584 new COVID-19 cases, 18,385 discharges, and 167 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) January 12, 2021
Total cases: 1,04,79,179
Active cases: 2,16,558
Total discharges: 1,01,11,294
Death toll: 1,51,327 pic.twitter.com/XmDBLn7RNh
गेल्या २४ तासांत देशभरात १८ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांचा एकूण आकडा ०१ कोटी ०१ लाख ११ हजार २९४ वर पोहोचला आहे. गेल्या १८ दिवसांत देशभरात ३०० हून कमी रुग्ण दगावल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर पोहोचला असून, मृत्युदर १.४४ टक्क्यांवर आहे.
दरम्यान, देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाणार असून, सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोना लसीचा पुरवठा करण्यास आजपासून (मंगळवार) सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशिल्ड लसीची पहिली खेप रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना लसीचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. यासाठी प्रवासी विमानांना कोरोना लसीच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. देशात प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.