Coronavirus Update: गेल्या २४ तासांत कोरोनाचे २० हजार नवे रुग्ण; बरे होण्याचा दर ९६ टक्के
By देवेश फडके | Published: January 7, 2021 01:57 PM2021-01-07T13:57:20+5:302021-01-07T14:00:17+5:30
गेल्या २४ तासांत देशभरात २० हजार ३४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात बरे होण्याचा दर वाढून ९६.१६ टक्के झाला आहे.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे संकट अद्याप दूर होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २० हजार ३४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. बुधवारी १८ हजार ८८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (गुरुवार) सकाळी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची लागण झालेल्या २० हजार ३४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ०३ लाख ९५ हजार २७८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५० हजार ३३६ झाली आहे.
India reports 20,346 new COVID-19 cases, 19,587 discharges, and 222 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) January 7, 2021
Total cases: 1,03,95,278
Active cases: 2,28,083
Total discharges: 1,00,16,859
Death toll: 1,50,336 pic.twitter.com/6tTfdMLKlB
गेल्या २४ तासांत १९ हजार ५८७ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १६ हजार ८५९ झाली आहे. देशात बरे होण्याचा दर वाढून ९६.१६ टक्के झाला असून, कोरोनाचा मृत्युदर १.४५ टक्के आहे. तसेच देशभरात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २ लाख २८ हजार ०८३ आहे. ६ जानेवारी २०२१ पर्यंत संपूर्ण देशभरातून १७ कोटी ८४ लाख ९९५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. यापूर्वी ५८ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचे समोर आले होते. बुधवारी यात नव्या १३ रुग्णांची भर पडून एकूण आकडा ७१ झाला आहे. या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेले आहेत.