दिलासादायक! देशभरात उपचाराधीन रुग्ण ८४,५६५ वर; बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:57 AM2021-12-19T05:57:31+5:302021-12-19T05:58:13+5:30
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय चंदीगड शिक्षण विभागाने घेतला आहे.
नवी दिल्ली : देशात एका दिवसात कोरोनाचे ७,१४५ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ३,४७,३३,१९४ झाली आहे. तर, उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ८४,५६५ झाली आहे.
गत २४ तासात २८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढून ४,७७,१५८ झाली आहे. दैनंदिन रुग्ण गत ५१ दिवसांपासून १५ हजारांपेक्षा कमी आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या ०.२४ टक्के आहे. ही संख्या मार्च २०२० नंतरची सर्वात कमी आहे. बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के आहे.
चंदीगड : सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय चंदीगड शिक्षण विभागाने घेतला आहे. शहरातील सर्व सरकारी, खासगी शाळा २० डिसेंबरपासून ते ७ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा १८ ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आल्या होत्या. पालकांच्या परवानगीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सांगण्यात आले होते. तथापि, ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने वर्ग सुरू होते. चंदीगडमध्ये गत आठवड्यात १२६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका पाहता शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात लसीकरण प्रमाणपत्रावर नेत्यांची नावे
लखनौ : उत्तर प्रदेशात इटावा जिल्ह्यात लसीकरण प्रमाणपत्रावर चक्क नेत्यांची नावे आली आहेत. या प्रमाणपत्रावर अमित शहा, नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांच्या नावासारखी नावे टाकण्यात आली आहेत. ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.