रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 05:37 AM2024-05-03T05:37:30+5:302024-05-03T05:37:52+5:30
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शक्सगाम खोरे हा भारताचा भाग असून त्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा आम्हाला हक्क आहे.
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्यात चीनने पक्का रस्ता बांधण्याचे काम सुरू केले आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनच्या जवळ हा प्रदेश आहे. चीनच्या या हालचालींचा भारताने तीव्र निषेध केला आहे. शक्सगाम खोरे हा आमचा भाग आहे असे भारताने ठाम शब्दांत चीनला सुनावले आहे. चीन व पाकिस्तानमध्ये १९६३ साली सीमेबाबत झालेला तथाकथित करार आम्हाला मान्य नसल्याचेही भारताने म्हटले आहे.
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शक्सगाम खोरे हा भारताचा भाग असून त्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा आम्हाला हक्क आहे. पूर्व लडाखच्या मुद्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता चीनने शक्सगाम खोऱ्यात कारवाया सुरू केल्या आहेत.
रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शक्सगाम खोरे हा भारताचाच भाग असून पाकिस्तान तो प्रदेश अवैधरीत्या चीनच्या ताब्यात देऊ पाहत आहे. त्याचा भारताने चीनकडे तीव्र निषेध नोंदविला आहे.
पूर्व लडाखप्रश्नी लवकरच चर्चेची फेरी
पूर्व लडाखच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याकरिता भारत व चीनमधील चर्चेची पुढची फेरी लवकरच पार पडणार आहे. या प्रश्नावर भारत व चीनमध्ये राजनैतिक व लष्करी पातळीवर याआधीपासून चर्चा सुरू आहे. योग्य तोडगा निघण्यास अधिक वेळ लागणार, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले