पाकिस्तानमधील महागाईसाठी भारत जबाबदार; इम्रान खानच्या मंत्र्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:20 PM2019-12-04T16:20:02+5:302019-12-04T16:21:03+5:30
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळली असून तेथील महागाईसाठी भारत जबाबदार असल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्याने केला आहे. पाकिस्तानातील अर्थ मंत्री हमाद अजहर यांनी देशातील खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींसाठी भारतासोबतचा व्यापार रद्द झाल्याचे कारण दिले आहे. पाकिस्तानातील टॉमेटोचे दर 400 रुपयांवर पोहोचले आहेत.
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे. वस्तूंच्या किंमतींनी मोठी झेप घेतली असून भारताने व्यापार रद्द केल्याने असे झाल्याचे अजहर यांनी सांगितले. पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे आणि महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे.
पाकिस्तानातील महागाईला हवामानाच्या लहरीपणासोबत त्यांनी दलालांनाही जबाबदार धरले आहे. केंद्र स्वस्त बाजार उभारण्यासाठी प्रांतीय सरकारांसोबत चर्चा करत आहे. महागाईने नागरिक त्रस्त असून जानेवारी-फेब्रुवारीनंतर महागाई कमी होण्यास सुरुवात होईल, असा दावाही अजहर यांनी केला आहे.
पाकिस्तानला लाखो डॉलरच्या कर्जाची परतफेड चीनकडे करायची आहे. पाकिस्तानमध्ये पुढील 12 महिने महागाई दर 13 टक्के राहणार आहे. यंदाचा हा दर 7.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर 2018 मध्ये महागाई दर 3.9 टक्के होता. इम्रान खानला अमेरिकेनेही मदत नाकारली आहे.