भारत धावला मदतीला!
By admin | Published: April 26, 2015 02:20 AM2015-04-26T02:20:47+5:302015-04-26T02:20:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भूकंपग्रस्त भाग आणि नेपाळला मदत आणि बचाव पथके त्वरित रवाना करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेपाळमध्ये आक्रोश : बचाव आणि मदत पथके पाठविण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भूकंपग्रस्त भाग आणि नेपाळला मदत आणि बचाव पथके त्वरित रवाना करण्याचे निर्देश दिले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितले.
भूकंपानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोअल, मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) व भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
देशाच्या विविध भागात शक्तिशाली भूकंपानंतर पंतप्रधानांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करून संपूर्ण परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवले. बिहार, सिक्किम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी माहिती घेतली. एनडीआरएफ कर्मचारी व मदत साहित्य नेपाळला रवाना नेपाळमधील भीषण भूकंप लक्षात घेता वायुसेनेचे सी-१३० जे सुपर हर्क्युलस विमान आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि मदत साहित्यासह नेपाळला पाठविण्यात आले आहे. संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सी-१७ ग्लोबमास्टर सज्ज करण्यात आले असून यात ४० सदस्यीय रॅपिड अॅक्शन एरो मेडिकल टीम आणि डॉक्टर्स नेपाळला जातील. याशिवायही मदत साहित्य पाठविण्यात येत आहे.
नरेंद्र मोदींचे नेपाळी
पंतप्रधानांना आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव यांच्याशी बातचीत केली आणि या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
भूकंपग्रस्तांना
तातडीने मदत मिळावी - सोनिया
नेपाळमधील विनाशकारी भूकंप आणि त्याचे भारतात जाणवलेले भयानक परिणाम याबाबत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भूकंपात अडकलेल्यांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षाही सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. भूकंपग्रस्त लोकांवरील हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी मी प्रार्थना करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आफ्टरशॉक्स सुरूच राहणार
नेपाळ आणि भारत हादरवणारा शनिवारचा भूकंप नेपाळमधील १९३४ पासूनचा सर्वात मोठा भूकंप आहे. रिश्टर स्केलवर ७.९ एवढी तीव्रता नोंदला गेलेला आजचा हा भूकंप असून, यापुढे १० ते १५ दिवस आफ्टरशॉक्स सुरूच राहतील, असा अंदाज नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनजीआरआय)चे मुख्य शास्त्रज्ञ आर. के. चंदा यांनी सांगितले.
उघड्यावरच उपचार
जखमी नागरिकांची रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. जागेअभावी अनेकांवर उघड्या जागी उपचार करावे लागत आहेत. मंत्रिमंडळाने तातडीने बैठक घेऊन २९ जिल्हे संकटांचे विभाग म्हणून जाहीर केले आहेत, असे गृहमंत्रालयाने सांगितले.
आज आम्ही ज्या परिस्थितीला तोंड देत आहोत ती हाताळण्यासाठी आम्हाला अधिक अनुभवी व तांत्रिक क्षमता असलेल्या विदेशी संस्थांची मदत हवी आहे, असे माहितीमंत्री मिनेंद्र रिजाल यांनी सांगितले.
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले असून नागरिकांनी भूकंपानंतरचे धक्के बसण्याची शक्यता असल्यामुळे मोकळ्या जागी जावे व शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पशुपतीनाथा, आम्हाला वाचव
नेपाळमध्ये बहुसंख्य नागरिक हिंदू आहेत. येथील पशुपतीनाथाचे मंदिरही जगप्रसिद्ध आहे. आजच्या भूकंपानंतर नेपाळी नागरिकांनी या संकटातून वाचविण्याची विनंती मनोमन पशुपतीनाथाला केली. या भूकंपात मंदिराचे थोडेसे नुकसान झाले आहे.
योगगुरू बाबा रामदेव बचावले
भूकंपाने काठमांडू हादरले तेव्हा
योगगुरू बाबा रामदेव एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून खाली उतरले
आणि क्षणार्धात ते व्यासपीठ कोसळले.
बाबा रामदेव थोडक्यात सुखरूप बजावले. माझ्या डोळ््यादेखत समोरची एक बहुमजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
काठमांडूमधील तुंडी खेल मैदान या सर्वात मोठ्या मैदानावर सुमारे दोन लाख भूकंपग्रस्त लोक आश्रयाला आले आहेत, असे रामदेव बाबा यांनी कार्यालयामार्फ त पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.