आधार-बँक खाते जोडले; अनुदान वळवल्यानं सरकारचे 90 हजार कोटी वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 08:37 AM2018-07-12T08:37:06+5:302018-07-12T08:40:39+5:30
अनुदान थेट बँक खात्यात वळवल्यानं सरकारला फायदा
हैदराबाद : आधार कार्डच्या मदतीनं थेट बँकांमध्ये अनुदान जमा केल्यानं सरकारचे 90 हजार कोटी रुपये वाचले आहेत. आधारच्या वापरामुळे आतापर्यंत 90 हजार कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) चेयरमन जे. सत्यनारायण यांनी दिली. 'डिजिटल ओळख' यावर आधारित एका आंतरराष्ट्रीय संमेलनात सत्यनारायण बोलत होते.
देशातील जवळपास 3 कोटी लोक दररोज आधारचा वापर करतात. शिधावाटप, निवृत्ती वेतन, रोजगार, शिष्यवृत्ती अशा विविध कारणांसाठी आधारचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, असं सत्यनारायण म्हणाले. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसकडून या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कालपासून या संमेलनाला सुरुवात झाली. 'पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न पुरवठा, ग्रामीण विकास आणि अन्य विभागांमध्ये आधारचा वापर वाढला आहे. त्यामुळे सरकारचे 90 हजार कोटी वाचले आहेत,' अशा माहिती त्यांनी यावेळी दिली. 'शासनाकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे अदृश्य शासनाची संकल्पना आकार घेत आहे,' असंही त्यांनी म्हटले.
आपल्याला काही क्षेत्रांमध्ये आणखी सुधारणा करायला हव्यात, असं सत्यनारायण म्हणाले. 'अत्याधुनिक बायोमेट्रिक तंत्रज्ञान, आधार ईको तंत्र, नामांकन प्रक्रिया, अपडेशन यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारची होणारी फसवणूक उजेडात येऊ शकेल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येऊ शकतो,' असं त्यांनी म्हटलं.