चोक्सीची भारतात रवानगी होण्यासाठी पाठवले दस्तऐवज; प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांना येणार यश?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:01 AM2021-05-31T07:01:55+5:302021-05-31T07:02:24+5:30
सीबीआय आणि ईडीच्या सुत्रांनी म्हटले की, फक्त केसच्या फाईल्स डोमिनिकाला पाठवल्या आहेत. डोमिनिका आणि एंटिगुआच्या सरकारांशी परराष्ट्र मंत्रालय याप्रकरणी समन्वय राखून आहे.
नवी दिल्ली : पंजाब अँड नॅशनल बँकेच्या (पीएनबी) कर्ज घोटाळ्यातील फरार आरोपी, हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सी याची भारतात रवानगी व्हावी, यासाठी संबंधित दस्तऐवज डोमिनिकाला पाठवले. सध्या तो कॅरेबियन देशात आहे. एंटिगुआतून क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना त्याला पकडले. एंटिगुवाचे नागरिकत्व मिळवल्यानंतर तो २०१८ पासून तेथे राहात आहे. सीबीआय आणि ईडीच्या सुत्रांनी म्हटले की, फक्त केसच्या फाईल्स डोमिनिकाला पाठवल्या आहेत. डोमिनिका आणि एंटिगुआच्या सरकारांशी परराष्ट्र मंत्रालय याप्रकरणी समन्वय राखून आहे. सीबीआय आणि ईडी त्या प्रकरणाच्या तपशिलांबाबत साह्य करीत आहे.
१३ हजार कोटींच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणी कथित मास्टरमाईंड मेहुल चोक्सी याने वकिलांच्या हवाल्याने म्हटले की, माझे २३ मे, २०२१ रोजी भारतासाठी काम करीत असलेले लोक व एंटिगुआच्या अधिकाऱ्यांनी अपहरण केले आहे. मला मारहाण केली गेली. एका जहाजातून डोमिनिकात नेले गेले. तेथे मला अटक केली. एंटिगुआच्या पोलीस प्रमुखाने स्पष्ट केले की, चोक्सीचे ना अपहरण झाले ना त्याला छळण्यात आले.
विमान पाठवले
चोक्सी याला आणण्यासाठी भारत सरकारने जेट विमान पाठवल्याच्या वृत्ताला एंटिगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्रॉउने यांनी एका मुलाखतीत दुजोरा दिला. या विमानातून चोक्सीशी संबंधित प्रकरणाचा दस्तऐवजही पाठवल्याचे बोलले जाते. हा दस्तऐवज डोमिनिकाच्या न्यायालयात ठेवता येईल. भारत सरकार या दस्तऐवजांतून हे सिद्ध करू इच्छिते की, मेहुल चोक्सी हा फरार आहे व त्याला ताबडतोब आमच्या ताब्यात दिले जावे.