"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 08:51 AM2024-07-21T08:51:40+5:302024-07-21T08:59:45+5:30

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.

India should learn from China and create an economic model that generates employment says Minister Nitin Gadkari | "चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

Minister Nitin Gadkari: रोजगाराची समस्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणही नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत. विविध राजकीय पक्ष बेरोजगारी हटवण्याचे आश्वासन देत असले तरी ते पूर्ण होताना दिसत नाही. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगारासंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे. भारताला विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि सामाजिक-आर्थिक मॉडेलची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रोजगाराबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत रोजगाराच्या संधीबाबत भाष्य केले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी लवचिक आर्थिक धोरणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणारे आणि असमानता कमी करणारे सामाजिक-आर्थिक मॉडेल आवश्यक असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. एका मराठी पुस्तकाच्या लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

"चीनमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि कोरोनानंतर अनेक देश त्यांच्याशी व्यवसाय करण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुसरीकडे शेजारीली देश मंदीसदृश परिस्थितीतून जात असून तिथे अनेक कंपन्या तेथे बंद पडत आहेत. पण आपण चीनकडून एक गोष्ट शिकू शकतो ती म्हणजे समाजवादी, साम्यवादी किंवा भांडवलशाही बनण्याआधी, आपण अशी अर्थव्यवस्था बनली पाहिजे जी रोजगार निर्माण करू शकेल, गरिबी दूर करू शकेल आणि समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता निर्माण करू शकेल," असे नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष असताना चिनी राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीची आठवण नितीन गडकरींनी सांगितली. "चिनी राष्ट्रपतींनी मला सांगितले होते की चिनी लोक त्यांच्या देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि विचारधारेची पर्वा न करता काहीही करण्यास तयार आहेत," असेही नितीन गडकरी म्हणाले.

"गरिबी दूर करण्यासाठी, भांडवली गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी, निर्यात वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक धोरणांमध्ये अधिक लवचिकता आणण्याची गरज आहे. आपल्याला कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि आदिवासी लोकसंख्येतील लोक गरीब राहिल्यास, रोजगाराशिवाय त्यांचे दरडोई उत्पन्न वाढलेच नाही तर आत्मनिर्भर भारत निर्माण होऊ शकत नाही," असेही गडकरींनी स्पष्ट केले.
 

Web Title: India should learn from China and create an economic model that generates employment says Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.