भारतानं बलुचिस्तानला स्वतंत्र करावे - नायला कादरी
By Admin | Published: October 12, 2016 05:07 PM2016-10-12T17:07:57+5:302016-10-12T19:53:07+5:30
भारत तिबेट आणि बांगलादेशसारखा आम्हालाही न्याय मिळवून देईल अशी आशा आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - बलुचिस्तानच्या नेत्या नायला कादरी या सध्या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यानंतर एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बातचीत करताना बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला आहे. "आंतरराष्ट्रीय स्तरावर काही गोष्टी वेगाने बदलत आहेत. भारत तिबेट आणि बांगलादेशसारखा आम्हालाही न्याय मिळवून देईल अशी आशा आहे", असंही त्या म्हणाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलोच गव्हर्नरचं समर्थन केलं पाहिजे. भारतानं बलुचिस्तानच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकही बोलावून, बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून द्यायला हवं, असंही त्या म्हणाला आहेत.
नायला कादरी यांचा मुलगा मझदाक दिलशाद हे आधीपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आग्रही असून, त्यादृष्टीनं त्यांनी प्रचारही सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानमध्ये होणा-या अन्यायाचा उल्लेख केल्यानं गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारताचा तिरंगा डौलानं फडकला होता. पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळलेल्या बलूची लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिल्या होत्या. विशेष म्हणजे बलुचिस्तानमधले शहीद म्हणून ओळखले जाणारे नेते अकबर बुगती यांच्या फोटोसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही झळकले. त्यामुळे पाकिस्तानला पोटशूळ उठलं.
बलुचिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून होणा-या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू आहे. आक्रमक झालेल्या बलूची लोकांनी पाकिस्तानचा झेंडाही तुडवला होता. तसेच सुई, डेरा बुगती, जाफराबाद, नसिराबादसह बलुचिस्तानच्या इतर भागांतही पाकिस्तानच्या अन्यायाविरोधात जोरदार आंदोलनं सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी बलुचिस्तान, गिलगिलत-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आपले आभार मानले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधल्या प्रभावशाली नेत्या नायला कादरी यांनी भारताकडे बलुचिस्तानला स्वतंत्र करावं, अशी मागणी केली आहे.