चीन सीमेवर भारताने दाखवली वायुशक्ती! अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात लढाऊ विमानांच्या घिरट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:27 AM2022-12-16T06:27:24+5:302022-12-16T06:27:45+5:30
घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला युद्धसराव हा एक प्रकारे चीनला इशारा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या सैनिकांना पिटाळून लावल्यानंतर आता भारताने आपली वायुशक्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय
हवाई दलाच्या राफेल व सुखोई लढाऊ विमानांनी ईशान्य भारतातील तेजपूर, जोरहाट, चाबुआ, हाशिमारा येथील हवाई तळांवरून उड्डाण करून तवांग येथील सीमाभागामध्ये गुरुवारी युद्धसराव केला असून, तो आज, शुक्रवारीदेखील सुरू राहणार आहे.
घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला युद्धसराव हा एक प्रकारे चीनला इशारा आहे. या विमानांचा दोन दिवस चालणारा युद्धसराव पूर्वनियोजित आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, तरीही या विमानांनी भारत-चीनच्या सीमेपर्यंत उड्डाण करणे हा चीनला सूचक इशारा असल्याचे मानण्यात येत आहे.
चिनी सैनिकांच्या अनेक वस्तू केल्या जप्त
अरुणाचल प्रदेशमधील तवांग क्षेत्रात ९ डिसेंबर रोजी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ६०० चिनी सैनिकांना भारतीय लष्कराने हुसकावून लावले. त्यावेळी झालेल्या झटापटीत चिनी सैनिक आपल्याकडील अनेक वस्तू तिथेच टाकून पळून गेले. त्या वस्तू भारतीय जवानांनी जप्त केल्या असून, त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत.
ड्रोन पाठविण्याचा चीनचा प्रयत्न फसला
तवांगमध्ये दोन देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या काही दिवस आधी अरुणाचलच्या सीमाभागात चीनने आपले ड्रोन पाठविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यात भारतीय हवाई दलाच्या विमानांचे महत्त्वाचे साहाय्य जवानांना झाले होते.
भारताकडून प्रत्युत्तर : गोखले
नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देऊ शकते. त्यामुळे चीनने कोणत्याही भ्रमात राहू नये, असा इशारा परराष्ट्र खात्याचे माजी सचिव विजय गोखले यांनी दिला आहे. चीनच्या कोणत्याही आगळीकीचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असेही ते म्हणाले.