भारताने ड्रॅगनला दाखविली ताकद; लडाखमध्ये १४ हजार ५०० फूट उंचीवर जोरदार सराव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:37 AM2023-07-09T09:37:24+5:302023-07-09T09:37:53+5:30
लष्कराने नवी शस्त्रे व वाहनांसह सिंधू नदीच्या किनारी १४ हजार ५०० फूट उंचीवर सरावही केला.
नवी दिल्ली - गेल्या चार वर्षांपासून लडाख सीमेवर चिनी लष्करासोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने न्योमा लष्करी तळावर नवे रणगाडे, तोफा व चिलखती वाहने तैनात केली आहेत. शनिवारी याचे फुटेज व फोटो समोर आले. यात धनुष हॉवित्झर तोफेसह एम४ क्विक रिॲक्शन फोर्स व्हेइकलचा समावेश आहे. याशिवाय डोंगराळ भागात चालणारी 'ऑल टेरेन व्हेइकल' देखील तैनात करण्यात आली आहेत.
लष्कराने नवी शस्त्रे व वाहनांसह सिंधू नदीच्या किनारी १४ हजार ५०० फूट उंचीवर सरावही केला. त्याचाही व्हिडीओ समोर आला आहे. यात टी. ९० व टी-७२ रणगाडे नदी ओलांडत असल्याचे दिसते. लष्कराने स्वदेशी बनावटीची धनुष हॉवित्झर तोफ आपल्या ताफ्यात दाखल करून घेतली आहे. बोफोर्स तोफेची ही प्रगत आवृत्ती आहे. धनुष हॉवित्झर ४८ किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकते. ही तोफ मागील वर्षीच पूर्व लडाख सेक्टरमधील लष्करी ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती, असे आर्टिलरी रेजिमेंटचे कॅप्टन व्ही. मिश्रा यांनी सांगितले.
ऑल टेरेन व्हेइकल लष्कराने सर्व प्रकारच्या भूप्रदेशात चालणारी वाहने (ऑल टेरेन व्हेइकल) देखील समाविष्ट केली आहेत. यात एकावेळी चार ते सहा सैनिक बसून जाऊ शकतात. ही वाहने सैनिकांचे सामान आणि उपकरणे नेण्यासाठी वापरली जातात. २०२० मध्ये गलवानमध्ये चिनी सैन्यासोबतच्या चकमकीनंतर हे वाहन प्रथमच तैनात करण्यात आले आहे.
एम-४ क्विक रिॲक्शन फोर्स वाहन
एम-४ क्विक रिअॅक्शन फोर्स हे चिलखती वाहन असून, त्याच्यावर भूसुरुंगांचा परिणाम होत नाही. ५० किलोपर्यंतच्या आयईडी स्फोटातही त्याचे नुकसान होत नाही. लडाख सेक्टरच्या कठीण भागातही ते सुमारे ६०-८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते, असे या सेक्टरमध्ये तैनात लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एन-४ क्चिक रिअॅक्शन फोर्सची वाहने गेल्या वर्षी लष्करी दलात सामील होण्यास सुरुवात झाली. पूर्व लडाख सेक्टरमध्ये अशी आणखी वाहने सामील करण्याची लष्कराची योजना आहे.