सायबर क्राइममध्ये भारत जगात ‘नंबर वन’, महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 07:39 AM2023-04-03T07:39:31+5:302023-04-03T07:40:15+5:30
देशात ६८ टक्के यूझर्स ठरले विविध गुन्ह्यांचे बळी
महेश घाेराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नोटाबंदी तसेच कोविडनंतर देशात ऑनलाइन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मोबाइल इंटरनेटचा वापर चैनीबरोबरच सोयीचाही झाला. मात्र दुसरीकडे सायबर क्राइमच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली. चिंतेची बाब म्हणजे सायब्रर क्राइम आणि त्याला बळी पडलेल्यांमध्ये जगात भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात ६८% यूझर्सनी डिसेंबर २०२२ पर्यंत कोणत्या ना कोणत्या सायबर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यानच्या एका सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. अमेरिका अशा घटनांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे ४९% लोकांना सायबर क्राइमचा वाईट अनुभव आहे.
महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक
- सायबर विश्वातून होणारा पाठलाग अर्थात सायबर स्टाॅकिंगमध्ये महाराष्ट्र २०२१ मध्ये देशात आघाडीवर होता. देशभरात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून समोर आली होती.
- अजूनही महाराष्ट्रात आक्षेपार्ह डाटा व्हायलर, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लॉटरी घोटाळे, लैंगिक छळ, बँकिंगशी संबंधित गुन्हे आदीचे प्रमाण चिंताजनक आहे.
- वाढते कॅशलेश व्यवहार, कोविडनंतर ऑनलाइन सेवांमध्ये झालेली वाढ याबरोबरच सायबर क्राइमचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले.
देशनिहाय यूझर्सचे प्रमाण
- ६८% - भारत
- ४९% - अमेरिका
- ४०% - ऑस्ट्रेलिया
- ३८% - न्यूझीलंड
- ३३% - इंग्लंड
- ३३% - फ्रान्स
- ३०% - जर्मनी
- २१% - जपान
(स्त्रोत : स्टॅटिस्टा रिपोर्ट, डिसेंबर २०२२ पर्यंतची स्थिती)