रिंकू सिंगची 'भक्ती', स्टार खेळाडूनं बांधलं देवीचं मंदीर; लाखोंचा खर्च अन् 'यशा'साठी प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:58 PM2023-10-12T13:58:41+5:302023-10-12T13:59:01+5:30
आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर रिंकूने सामाजिक बांधिलकी जपताना लाखो रूपयांचे मंदीर बांधले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॅट भेट दिली. अनेक युवा शिलेदारांना आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात टीम इंडियाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. आयपीएल स्टार रिंकू सिंग देखील भारतीय संघाचा सदस्य होता. मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील असलेला रिंकू आयपीएलच्या सोळाव्या हंगामातून प्रसिद्धीच्या झोतात आला. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात रिंकूने एकाच षटकात पाच षटकार खेचून इतिहास रचला. आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर रिंकूने सामाजिक बांधिलकी जपताना लाखो रूपयांचे मंदीर बांधले आहे.
आशियाई स्पर्धेत यंदा भारताने विक्रमी पदके जिंकताना पदकांचे शतक झळकावले. इतिहासात प्रथमच भारताला १०७ पदके जिंकता आली. या आधी भारतीय शिलेदारांनी २०१८ मध्ये सर्वाधिक ७० पदके जिंकली होती. पण, यंदाच्या पर्वात हा विक्रम मोडीत निघाला. आशियाई स्पर्धेत अलिगढ येथील दोन खेळाडू सहभागी झाले होते. रिंकू सिंग आणि कांस्य पदक विजेत्या गुलीवर सिंगने मोठ्या व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. मंगळवारी आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली बॅट पंतप्रधानांना भेट दिली. यावेळी सर्व खेळाडू उपस्थित होते.
रिंकूने मंदिराला दिले ११ लाख
उत्तर प्रदेशातील अलीगढच्या रिंकू सिंगने जिल्ह्यातील कमलपूर गावात कुलदेवी माँ चौदेरे देवीचे मंदिर बांधले आहे. रिंकूचा भाऊ सोनू सिंगने सांगितले की, मंदीर सुमारे ११ लाख रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. तसेच रिंकूला भविष्यात देखील असेच यश मिळावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. याशिवाय या मंदिरात १६ ऑक्टोबर २०२३ रोजी मूर्तीचा अभिषेक केला जाईल. पण या कार्यक्रमावेळी रिंकू तिथे नसेल. तो सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. दुलीप ट्रॉफी खेळल्यानंतर तो दिवाळीच्या मुहूर्तावर अलिगढला परतणार आहे, असेही रिंकूच्या भावाने सांगितले.