ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार
By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 04:14 PM2020-09-30T16:14:45+5:302020-09-30T16:25:36+5:30
चीनसोबत सीमेवर तणाव वाढला असताना भारताचा शस्त्रसज्जतेवर भर
नवी दिल्ली: चीनसोबतचा सीमा वाद वाढत असताना, पूर्व लडाखमधील तणाव कायम असताना भारतानं शस्त्रसज्जतेवर भर दिला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय हवाई दलात राफेल विमानं दाखल झाली. यानंतर आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसची आधुनिक आवृत्ती आहे. त्याची मारक क्षमता ४०० किलोमीटर इतकी आहे.
पीजे-१० प्रकल्पाच्या अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याची माहिती डीआरडीओनं दिली. ओदिशातल्या चांदिपूरमध्ये ब्रह्मोसची चाचणी घेण्यात आली. यामुळे भारतीय सैन्याचं सामर्थ्य आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात करण्यात आली आहे. क्षेपणास्त्राची एअरफ्रेम आणि बूस्टर भारतातच तयार करण्यात आलं आहे.
Congratulations to Team @DRDO_India and @BrahMosMissile for the successful flight testing of #BRAHMOS Supersonic Cruise Missile with Indigenous Booster and Air Frame for designated range.
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 30, 2020
This achievement will give a big boost to India’s #AtmaNirbharBharat Pledge. pic.twitter.com/39YuAcemed
ब्रह्मोसची अत्याधुनिक आवृत्ती डीआरडीओ आणि एनपीओएमनं तयार केली आहे. नवं ब्रह्मोस क्षेपणास्त्र जमिनीसोबतच युद्धनौका, पाणबुडी, लढाऊ विमानांमधूनही डागता येऊ शकतं. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून डीआरडीओचं अभिनंदन केलं.
२००५ मध्ये भारतानं आयएएनवर राजपूतवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात केलं. आता भविष्यात सर्वच युद्धनौकांवर अत्याधुनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात असेल. याआधी भारतीय लष्कराच्या तीन रेजिमेंटकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुपूर्द करण्यात आलं. ब्रह्मोसच्या अत्याधुनिक आवृत्तीमुळे लष्कराचं सामर्थ्य वाढणार आहे. सध्याच्या घडीला पूर्व लडाखमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतासाठी महत्त्वाची आहे.