भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:52 PM2022-06-15T23:52:32+5:302022-06-16T00:07:59+5:30
चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली.
भारताने बुधवारी ओडिशातील चांदीपूर येथे 250 किमीपेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करणाऱ्या, पृथ्वी-2 मिसाईलची यशस्वी चाचणी केली. DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधीपासूनच स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचा भाग आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चांदीपूर येथील Integrated Test Range (ITR) वरून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. तसेच, मिसाईल एक सिद्ध प्रणाली आहे आणि अत्यंत अचूकपणे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे, असेही मंत्रालयाने एक निवेदनात म्हटले आहे.
300 किमी एवढी मारक क्षमता -
यापूर्वीही, ओडिशातील बालासोर किनाऱ्यावर या मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणीही यशस्वी ठरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. पृथ्वी-2 हे एक स्वदेशी बनावटीचे आण्विक दृष्ट्या सक्षम असे मिसाईल आहे. या मिसाईलची मारक क्षमता 350 किमी एवढी आहे. एवढेच नाही, तर हे मिसाईल वॉरहेड्स वाहून नेण्यासही सक्षम आहे. तसेच, या मिसाईलला दोन इंजिन आहेत.
शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम-
पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईल आहे. पृथ्वी-2 मिसाईल 500-1000 किलोग्रॅमपर्यंतची शस्त्रे वाहून नेण्यासही सक्षम आहेत. स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र 150 ते 600 किमीपर्यंतचे लक्ष्य सहज भेदू शखते. पृथ्वी मालिकेत तीन क्षेपणास्त्रे आहेत - पृथ्वी-1, पृथ्वी-2 आणि पृथ्वी-3. यांची मारक क्षमता अनुक्रमे 150, 350 आणि 600 किमीपर्यंत आहे.