भारताला जपानचा डोकलामसाठी पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:05 AM2017-08-19T01:05:22+5:302017-08-19T01:05:25+5:30
चीनशी गेल्या दोन महिन्यांपासून सिक्कीमनजीक डोकलाम येथे सुरू असलेल्या वादात जपानने भारताची पूर्ण पाठराखण केली आहे.
नवी दिल्ली : चीनशी गेल्या दोन महिन्यांपासून सिक्कीमनजीक डोकलाम येथे सुरू असलेल्या वादात जपानने भारताची पूर्ण पाठराखण केली आहे. मूळ स्थिती बळाचा वापर करून एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न व्हायला नको, असे जपानने म्हटले.
डोकलाम वादावर भारताला प्रथमच एका मोठ्या देशाने नि:संदिग्ध पाठिंबा जाहीर केला आहे. चीन आणि भूतान यांच्यातील तो भाग वादग्रस्त असल्याची आम्हाला कल्पना आहे व दोन्ही देशांनी वाद असल्याचे मान्यही केले आहे, असे जपानचे राजदूत केनजी हिरामात्सू यांनी गुरुवारी येथे सांगितले.
हिरामात्सू म्हणाले की, वादग्रस्त भागाशी संबंधित सगळ््या पक्षांनी मूळ स्थिती बळाचा वापर करून एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न न करणे महत्त्वाचे आहे. वाद शांततेच्या मार्गांनीच सोडविला जावा.
डोकलाम वादावर दोन्ही बाजूंना स्वीकारार्ह होईल, असा शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत सातत्याने राजनैतिक मार्गांनी प्रयत्न करीत आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आधीच स्पष्ट केले आहे व ही भूमिका शांततापूर्ण तोडग्यासाठी महत्त्वाची असल्याचे आम्ही समजतो.
>करारामुळे भारत गुंतला
डोकलाम वादाचा परिणाम संपूर्ण विभागावर होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे जपानचे अतिशय बारकाईने लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या भूमिकेबद्दल हिरामात्सू म्हणाले की, भारत या वादात भूतानशी त्याच्या असलेल्या द्विपक्षीय करारांमुळे गुंतला असल्याची आम्हाला माहिती आहे.