जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:53 IST2025-04-08T18:52:06+5:302025-04-08T18:53:34+5:30
१९४० नंतर पहिल्यांदाच 'हा' आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...

जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं
भारताने २०२४ मध्ये पवन ऊर्जा आणि सौर उर्जेपासून वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत जर्मनीलाही मागे टाकत, एक मोठी झेप घेतली आहे. आता भारत या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. एका अहवालानुसार, भारताने जागतिक पातळीवर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून १५% वीजेची निर्मिती केली आहे. भारतात कमी कार्बन स्रोतांपासून (जसे की अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जा) 40.9% विजेची निर्मिती झाली आहे. १९४० नंतर पहिल्यांदाच हा आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
आता पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. या बाबतीत भारताने २०२४ मध्ये जर्मनीलाही मागे टाकले आहे. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या जगातील एकूण विजेपैकी १५% वीज एकट्या भारताने तयार केली.
भारताची जोरदार कामगिरी -
भारतात स्वच्छ स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेपैकी ८% जलविद्युत आणि १०% पवन आणि सौरऊर्जेपासून तयार झाली. २०२४ मध्ये जगभरात ८५८ टेरावॅट एवढ्या स्वच्छ ऊर्जेची भर पडली. हे प्रमाण २०२२ च्या तुलनेत ४९% अधिक आहे. भारतात २०२४ मध्ये निर्माण झालेल्या एकूण वीजेपैकी ७% वीज सौर ऊर्जेपासून निर्माण झाली. २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. याच बरोबर, भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौरऊर्जा बाजार बनला आहे.
यासंदर्भात बोलताना एम्बरचे व्यवस्थापकीय संचालक फिल मॅकडोनाल्ड म्हणाले, "बॅटरी स्टोरेजसह सौरऊर्जा ही जागतिक ऊर्जा बदलाचा केंद्रबिंदू बनली आहे." या अहवालात ८८ देशांचा समावेश आहे. हे देश जगातील ९३% वीज मागणी पूर्ण करतात.