Population: भारत १,४२,८६,००,०००, लोकसंख्येत चीनला टाकले मागे; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 07:51 AM2023-04-20T07:51:15+5:302023-04-20T07:51:49+5:30
Population: कित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे.
नवी दिल्ली : कित्येक दशकांपासून लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर असलेल्या चीनला मागे टाकून भारत आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली, तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या दर्शकानुसार ही बाब स्पष्ट झाली. १९५० पासून जागतिक स्तरावर लोकसंख्येची आकडेवारी गोळा केली जात आहे. पहिल्यांदाच भारताने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.
संयुक्त राष्ट्र जागतिक लोकसंख्या पुस्तिका २०२२ नुसार, भारताची लोकसंख्या २०५० पर्यंत १६६.८ कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, तर चीनची लोकसंख्या १३१.७ कोटींपर्यंत घसरू शकते. अहवालानुसार, जागतिक लोकसंख्या १९५० नंतर सर्वांत कमी वेगाने वाढत आहे, २०२० मध्ये ती एक टक्क्यांहून कमी वेगाने वाढली. गेल्या वर्षी भारताची लोकसंख्या १४१.२ कोटी होती, तर चीनची लोकसंख्या १४२.६ कोटी होती. १५ नोव्हेंबर रोजी जागतिक लोकसंख्या आठ अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)
यूपी-बिहार तरुण; केरळ, पंजाब ‘वृद्ध’
तज्ञांच्या मते, भारताची लोकसंख्या राज्यानुसार भिन्न आहे. केरळ आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध लोकसंख्या आहे, तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे.
लोकसंख्येची वयोगटांनुसार विभागणी
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए)च्या नवीन अहवालानुसार, भारतातील
०-१४ वयोगटातील २५%
१० ते १९ वयोगटातील १८%
१० ते २४ वयोगटातील २६%
१५ ते ६४ वयोगटातील ६८%
लोकसंख्येपैकी सात टक्के लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
तीन दशकांनंतर लोकसंख्या घटण्याची शक्यता
पुढील तीन दशकांपर्यंत देशाची लोकसंख्या वाढू शकते आणि त्यानंतर ती घटायला सुरुवात होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.
२५.४कोटी तरुणांची संख्या
यूएनएफपीएच्या भारताचे प्रतिनिधी आणि भूतानच्या ‘कंट्री डायरेक्ट’ आंद्रिया वोजनर म्हणाल्या, ‘भारताच्या १.४ अब्ज लोकांकडे १.४ अब्ज संधी म्हणून पाहिले पाहिजे. देशाची २५.४ कोटी लोकसंख्या ही तरुणांची आहे (१५ ते २४ वयोगटातील).