Coronavirus: आता देशांतर्गत विमान उड्डाणंही बंद; कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 06:09 PM2020-03-23T18:09:39+5:302020-03-23T18:23:21+5:30
Coronavirus कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय; उद्या रात्रीपासून अंमलबजावणी
नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी (उद्या) रात्री १२ वाजल्यापासून देशातील हवाई उड्डाणं बंद होतील. त्यामुळे उद्या रात्री १२ च्या आधी विमानं विमानतळांवर उतरतील, अशा प्रकारची योजना विमान कंपन्यांना आखावी लागेल. सरकारनं याआधीच रेल्वे वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
देशात दररोज जवळपास ६५०० विमानांची उड्डाणं होतात. ही उड्डाणं देशांतर्गत स्वरुपाची असतात. यामधून वर्षाकाठी १४४.१७ मिलियन प्रवासी प्रवास करतात. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशांतर्गत हवाई उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशात आतापर्यंत कोरोनाचे चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० नं वाढलाय.
Operations of domestic scheduled commercial airlines shall cease with effect from midnight on March 24. The restrictions shall not apply to cargo flights. #CoronavirusPandemicpic.twitter.com/XYL62SbVsk
— ANI (@ANI) March 23, 2020
दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. तर उत्तर प्रदेशमधल्या १६ जिल्ह्यांमध्ये २५ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. महाराष्ट्रातही जमावबंदीपाठोपाठ संचारबंदी लागू करण्यात आलीय.
देशातील प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कालच मोदी सरकारनं घेतला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द केल्या आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद आहेत. सध्या केवळ मालगाड्या सुरू आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच लोकल गाड्यादेखील बंद केल्या गेल्या आहेत.