जगातील सर्वाधिक एचआयव्ही रुग्णांमध्ये भारत तिसरा
By Admin | Published: July 17, 2014 12:45 PM2014-07-17T12:45:10+5:302014-07-17T12:45:26+5:30
जगात सर्वाधिक एचआयव्ही रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिस-या स्थानावर असून आशियातील १० एचआयव्ही रुग्णांपैकी ४ रुग्ण हे भारतातील असल्याचे माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १७ - जगात सर्वाधिक एचआयव्ही रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिस-या स्थानावर असून आशियातील १० एचआयव्ही रुग्णांपैकी ४ रुग्ण हे भारतातील असल्याचे माहिती समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २००५ ते २०१३ या कालावधीत भारतात एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने एचआयव्ही - एड्स संदर्भात बुधवारी एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात भारतातील एचआयव्ही रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. २०१३ मध्ये आशियात एड्समुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी तब्बल ५१ टक्के रुग्ण हे भारतातील होते. तर जागतिक स्तरावर हेच प्रमाण ८ टक्के ऐवढे होते. २०१३ च्या अखेरीस देशातील ७ लाख रुग्णांवर अँटी
रिट्रीव्हायरल थिरपीद्वारे (एआरटी) उपचार सुरु होते. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर एआरटीद्वारे उपचार करणा-या देशांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो असे दिलासादायक चित्र दिसते. गेल्या आठ वर्षात देशातील एचआयव्हीची लागण झालेल्या नवीन रुग्णांचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले असून याचे श्रेय समाजसेवा संस्था आणि सरकारी आरोग्य यंत्रणांना द्यायला हवे. मात्र रुग्णांचे प्रमाण घटत असले तरी आशियातील एकूण एचआयव्हीची लागण होणा-या नवीन रुग्णांपैकी ३८ टक्के रुग्ण हे भारतातीलच आहे. म्हणजेच प्रमाण घटत असले तरी भारतात अन्य देशांच्या तुलनेत एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात एचआयव्ही - एड्समुळे मृत्यू होणा-या रुग्णांचे प्रमाणही ३८ टक्क्यांनी घटले आहे.
भारतातील महिला एचआयव्ही रुग्णांमध्ये ७५ टक्के बाधित महिलांचे पती हे कामानिमित्त बाहेरच असतात. त्यांचे पती ट्रकचालक, कंत्राटी मजूर अशी काम करतात. काही राज्यांमध्ये हे प्रमाण ९० टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.
मुंबईतील रेड लाईट वस्त्यांमधील भीषण वास्तवही या अहवालातून समोर येते. मुंबईतील सुमारे २३ टक्के वारांगना या एचआयव्ही बाधित आहेत. यातील बहुसंख्य महिलांना जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडण्यात आले.