डोपिंगमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर
By admin | Published: April 29, 2016 02:46 AM2016-04-29T02:46:44+5:302016-04-29T02:46:44+5:30
स्पर्धात्मक खेळात भारत अद्याप माघारलेला आहेच; पण डोपिंगमध्ये मात्र जागतिक स्तरावर भारताने तिसरे स्थान पटकाविले.
नवी दिल्ली : स्पर्धात्मक खेळात भारत अद्याप माघारलेला आहेच; पण डोपिंगमध्ये मात्र जागतिक स्तरावर भारताने तिसरे स्थान पटकाविले. आंतरराष्ट्रीय डोपिंग संस्थेच्या (वाडा) अहवालानुसार २०१४ साली जी प्रकरणे उघड झाली, त्यात भारत ९६ प्रकरणांसह तिसऱ्या स्थानी आला. विविध देशांच्या राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने वाडाला दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार झाला आहे.
रशिया १४८ प्रकरणांसह अव्वल स्थानावर असून, इटली १२३ प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानंतर बेल्जियम ९१, फ्रान्स ९१, तुर्कस्तान ७३, आॅस्ट्रेलिया ४९, चीन ४९, ब्राझील ४६, आणि द. कोरिया ४३ यांचा अव्वल दहा देशांत समावेश आहे. या सर्व प्रकरणात खेळाडूंविरुद्ध निर्णय देण्यात आला. खेळाडूंना एकतर तंबी देण्यात आली किंवा काही काळासाठी निलंबित करण्यात आले, अशी ही प्रकरणे आहेत.
भारतात जी ९६ प्रकरणे सूचीबद्ध झाली त्यातील चार प्रकरणे विश्लेषणात्मक होती. अॅथलेटिक्स आणि कुस्तीमधील प्रत्येकी २ खेळाडू चौकशीसाठी उपस्थित होऊ शकले नाहीत. ९६ पैकी ५६ पुरुष आणि २३ महिला खेळाडू स्पर्धेदरम्यान झालेल्या परीक्षणात अपयशी ठरले. नऊ पुरुष आणि ४ महिला स्पर्धेनंतर झालेल्या परीक्षणात दोषी आढळल्या. १९२०पासून आजपर्यंत भारताच्या आॅलिम्पिक पदकांची संख्या केवळ २४ झाली; पण काही वर्षांत डोपिंगमध्ये सर्वाधिक खेळाडू अडकणाऱ्या देशांपैकी भारत प्रमुख देश ठरला आहे. सर्वाधिक डोपिंग प्रकरणे अॅथलेटिक्समधील आहेत. अॅथलेटिक्समध्ये २९, पॉवर लिफ्टिंगमध्ये २३, वेटलिफ्टिंग २२, बास्केटबॉल ३, ज्युडो ३, तायक्वांदो तीन, कुस्ती तीन, वुशू तीन, बॉक्सिंग दोन, कनोयिंग व कयाकिंग एक, नेमबाजी एक, सॉफ्ट टेनिस एक, पॅराअॅथलेटिक्स व पॅराज्योडो यातही प्रत्येकी एक खेळाडू दोषी आढळला.
अॅथलेटिक्समध्ये भारताचे २९, तर रशियाचे ३९ खेळाडू आहेत. इटली
१५, फ्रान्स १४, चीन १३ आणि
केनिया १२ असा क्रम आहे.
यावर भारतीय अॅथलेटिक्समधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे मते असे की, ही आकडेवारी विद्यापीठ स्तरावर, वयासंबंधी आणि शासकीय स्तरावरील स्पर्धेत डोपिंग झाल्यामुळे वाढली.
ही आकडेवारी नाडाच्या रेकॉर्डनुसार
पुढे आली, हे विशेष.