चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर! LAC वर असेल भारताचा विशेष तळ; सीमेवर जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 06:30 PM2023-10-03T18:30:23+5:302023-10-03T18:31:49+5:30
INDIA-China Border Issue: लडाख सीमेवर वाढत्या चिनी कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
INDIA-China Border Issue: जून २०२० पासून भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवरून तणाव असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनकडून सातत्याने लडाख येथे कुरापती सुरू असून, भारताकडूनही चीनला चोख उत्तर दिले जात आहे. यासंदर्भात भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून ठोस असे काही निष्पन्न झाले नाही. सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताने आता एक महत्त्वाचे पाऊल उचचले असून, LAC वरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार असल्याचे म्हटले जात आहे.
सीमा सुरक्षित असतात, तेव्हा तो देश अधिक सुरक्षित असतो, अशा आशयाचे विधान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच केले होते. यानंतर आता LAC वरून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारत-चीन सीमेवर आता बॉर्डर इंटेलिजेंस पोस्ट तैनात करण्यात येणार आहे. BIP तैनात करण्याची तयारी केली जात आहे. या पोस्टमुळे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल
सीमेवर चीनच्या वाढत्या कारवाया आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केलेल्या सीमा उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक बीआयपीवर चार-पाच इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी तैनात केले जातील. आयटीबीपीचे कर्मचारी त्यांचे संरक्षण करतील. बीआयपीवर तैनात केलेले सैनिक सीमापार हालचालींवर लक्ष ठेवतील. उच्च अधिकारी आणि सरकारला माहिती देतील.
दरम्यान, संपूर्ण भारत-चीन सीमेवर ITBP च्या सुमारे १८० चौक्या आहेत. अलीकडेच आणखी ४५ चौक्यांना मान्यता देण्यात आली होती. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकही गाव उरले नाही जिथे वाहने पोहोचू शकत नाहीत. ही सीमावर्ती गावे पूर्वी खूप मागास ठेवण्यात आली होती. तुम्हाला खात्री देतो की पुढील सहा महिन्यांत अरुणाचल प्रदेशातील सर्व सीमावर्ती गावांमध्ये 5G मोबाइल कनेक्टिव्हिटी असेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.