सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:45 IST2024-12-08T16:39:36+5:302024-12-08T16:45:25+5:30
Amit Shah : देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह
जोधपूर : भारत लवकरच आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी एक व्यापक अँटी-ड्रोन युनिट तयार करणार आहे, कारण आगामी काळात मानवरहित ड्रोनचा धोका गंभीर होणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. बीएएसएफच्या (BSF) 60 व्या स्थापना दिनानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेझर-सुसज्ज अँटी-ड्रोन गन-माउंट सिस्टमचे सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
या सिस्टममुळे पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन निष्क्रिय करणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या घटनांमध्ये 3 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. येत्या काळात ड्रोनचा धोका अधिक गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत संरक्षण आणि संशोधन संस्था व डीआरडीओ यांच्या सहकार्याने 'संपूर्ण सरकारी' दृष्टिकोनाने आम्ही या समस्येचा सामना करत आहोत. त्यामुळे आगामी काळात आम्ही देशासाठी सर्वसमावेशक अँटी ड्रोन युनिट तयार करणार आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले.
पाकिस्तान (2,289 किमी) आणि बांगलादेश (4,096 किमी) सह भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सर्वसमावेशक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणालीवर (CIBMS) काम सुरू आहे. यासह, आसाममधील धुबरी (भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा) नदीच्या सीमेवर तैनात असलेल्या सीआयबीएमएसकडून आम्हाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे, परंतु काही सुधारणा आवश्यक आहेत. संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवर एक व्यापक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे, ती पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर लागू केली जाईल, असे अमित शाह म्हणाले.
याचबरोबर, मोदी सरकार व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामद्वारे उत्तर सीमावर्ती गावांमध्ये कनेक्टिव्हिटी, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधा सुधारत आहे, ज्यामुळे स्थलांतर थांबत आहे. देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, सीमा सुरक्षा वाढवणे आणि 48,000 कोटी रुपयांचा निधी वाटप करून या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी काम करणे ही मोदी सरकारची सर्वात मोठी योजना आहे. सुमारे तीन हजार गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येत आहे, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, केंद्र सरकारने भारताच्या सीमेवर कुंपण, रस्ते आणि इतर गोष्टींसाठी मोठा अर्थसंकल्प मंजूर केला आहे, असेही अमित शाह यांनी सांगतिले.
260 हून अधिक ड्रोन केले निष्क्रिय
अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 260 हून अधिक ड्रोन भारत-पाकिस्तानच्या सीमेवरून पाडण्यात आले किंवा जप्त करण्यात आले, तर 2023 मध्ये ही संख्या जवळपास 110 होती. शस्त्रे आणि ड्रग्ज वाहून नेणाऱ्या ड्रोनला रोखण्याच्या सर्वाधिक घटना पंजाबमध्ये घडल्या आहेत, तर राजस्थान आणि जम्मूमध्ये फारच कमी आहेत.