भारत सहिष्णूच
By admin | Published: January 29, 2016 12:42 AM2016-01-29T00:42:55+5:302016-01-29T00:42:55+5:30
मी भारतीय आहे. त्यामुळे मी (एकाच वेळी) हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्धही आहे. कलाकारांना कोणताही धर्म नसतो व माझ्यापुरते सांगायचे तर संगीत हाच माझा धर्म आहे, असे विख्यात
तिरुवनंतपूरम : मी भारतीय आहे. त्यामुळे मी (एकाच वेळी) हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्धही आहे. कलाकारांना कोणताही धर्म नसतो व माझ्यापुरते सांगायचे तर संगीत हाच माझा धर्म आहे, असे विख्यात तबलापटू उस्ताद झाकीर हुसैन यांनी येथे सांगितले.
उस्ताद झाकीर हुसैन यांचा शशांक सुब्रमण्यम व राकेश चौरासिया या पट्टीच्या बासरीवादकांसोबत जुगलबंदीचा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम बुधवारी झाला. त्याआधी पत्रकारांशी बोलताना झाकीर हुसैन यांनी अनेक विषयांवर आपली सडेतोड मते व्यक्त केली.
असहिष्णुतेवरील चर्चेविषयी विचारता वरीलप्रमाणे मत व्यक्त करताना झाकीर हुसैन म्हणाले की, कदाचित काही राजकारण्यांना काही तरी गडबड असल्याचे प्रामाणिकपणे वाटत असावे. म्हणून त्यांच्यासाठी अहिष्णुतेचा विषय ठळकपणे मांडणे महत्वाचे असू शकते. पण मला तसे वाटत नाही. माझ्या मते भारत हा खूपच सहिष्णू देश आहे. मी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्धही आहे, कारण मी भारतीय आहे.
स्त्रिया तिथे जाऊ शकतात का? या प्रश्नावर वर झाकीर हुसैन म्हणाले की, एक हजार महिलांनी एकाच वेळी शबरीमला येथे जाण्याचे मनावर घेतले तर त्या तेथील मंदिरातही प्रवेश करू शकतात.
संगीताची जातकुळी एकच
झाकीर हुसैन म्हणाले, कर्नाटकी आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत परस्परांशी मेळ खात नाही हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. संगीत, मग ते हिंदुस्तानी असो वा कर्नाटकी, ते सात सुरांवरच आधारलेले असते. दोन्हींचा पाया एकच आहे. संगीतात भेदभाव करायचा, हा विरोधाभास आहे.(वृत्तसंस्था)
मी स्वत:ला सर्वोत्तम तबलापटू कधीच मानत नाही. देशातील १५-२० उत्तम तबलापटूंपैकी मी एक आहे. ज्या एखाद्या दिवशी भट्टी जमते तेव्हा इतरही माझ्यापेक्षा सरस ठरतात.