भारत सच्चा मित्र!

By admin | Published: June 28, 2017 12:37 AM2017-06-28T00:37:09+5:302017-06-28T00:40:04+5:30

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूवी मी भारत अमेरिकेचा सच्चा मित्र आहे, असे म्हटले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरही

India is a true friend! | भारत सच्चा मित्र!

भारत सच्चा मित्र!

Next

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूवी मी भारत अमेरिकेचा सच्चा मित्र आहे, असे म्हटले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरही मी ते पुन्हा एकदा अधोरेखीत करू इच्छितो. भारत अमेरिकेचा सच्चा मित्र आहे आणि यापूर्वी कधीही नव्हते इतके दृढ संबंध दोन्ही देशांमध्ये आहेत, असे गौरवोद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोघांची सविस्तर भेट झाली आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही झाली. मोदी यांचे आगमन झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या पत्नीसह उपस्थित राहून स्वागत केले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानाचे स्वागत करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मोदी आणि मी सोशल मीडियातही जगाचे लीडर आहोत, असे ट्रम्प यांनी दोघांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.
भारत-अमेरिकेच्या संविधानात वुई द पीपल हे तीन शब्द समान आहेत. आजच्या भेटीनंतर मी म्हणू शकतो की भारत आणि अमेरिकेमध्ये इतके चांगले संबंध यापूर्वी कधीच नव्हते. मोदी तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. भारत जगातील सर्वाधिक जलद वाढ होणारी अर्थव्यवस्था आहे.
मोदी म्हणाले, तुम्ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहात तर आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही. या परंपरेला एकत्र पुढे नेऊया. भारत-अमेरिका एकत्र येऊन जगाला काहीतरी देऊ शकतो. या दिशेने तुमचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत अमेरिकेसाठी आणि अमेरिका भारतासाठी चांगले सहकारी आहे. मोदी म्हणाले, आमच्यात झालेली चर्चा सर्वार्थाने अत्यंत महत्त्वाची होती. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश म्हणजे विकासाचे ग्लोबल इंजीन आहे.
आर्थिक संबंध मजबूत करण्याचा संकल्प
भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध मजबूत करण्याचा संकल्प मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. तसेच दोन्ही देशातील मतभेदही दूर करण्यावर या नेत्यांनी भर दिला.
व्हाइट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या पहिल्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आर्थिक मुद्यावर दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली. नागरी विमान वाहतूकीचा बाजार आणि नैसर्गिक गॅस या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात येणार आहे. पुढील वर्षीपासून द्रवरुप नैसर्गिक गॅस (एलएनजी) अमेरिकेतून भारतात जाणार आहे. काही वर्षात भारत - अमेरिका यांच्यातील एलएनजी व्यापार ४० लाख डॉलरपेक्षा अधिक होणार आहे.
एच १ बी व्हिसा प्रकरणी एका प्रश्नावर जयशंकर यांनी सांगितले की, या मुद्यावर उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी डिजिटल पार्टनरशिपबाबत चर्चा केली. दोन्ही देशातील मजबूत संबंधात भारतीय अमेरिकी समुदायाचे योगदान मोठे आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देश अर्थव्यवस्थेसाठी वृद्धीचे इंजिन आहेत. दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्यावर या नेत्यांनी भर दिला. व्हाईट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशातील वस्तू व सेवा व्यापार २०१६ मध्ये ११४ अब्ज डॉलरवर पोहचला आहे.
अमेरिकेच्या निर्यातीतील अडथळे दूर करा
अमेरिकेतून भारतात होणाऱ्या निर्यातीच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले. दोन्ही देशांतील व्यापारी संबंध वाढविणे आणि संतुलित करण्याचा संकल्प या नेत्यांनी केला. बैठकीनंतर मोदी यांच्यासोबत मीडियाशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंंध न्यायपूर्ण आणि बरोबरीवर आधारित असावा. भारताच्या बाजारपेठेत अमेरिकी वस्तूंच्या निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या जाव्यात. जेणेकरुन आमचा व्यापारातील तोटा कमी होईल.
अमेरिकेतील व्यापार प्रतिनिधीच्या आकडेवारीनुसार, भारत आणि अमेरिका हे नऊ क्रमांकाचे सर्वात मोठे व्यापार सहकारी आहेत. मागील वर्षी दोन्ही देशातील वस्तंूचा व्यापार ६७.७ अब्ज डॉलरचा होता. अर्थात चीनच्या तुलनेत हा आकडा फार मोठा नाही. अमेरिकेसोबत चीनचा व्यापार ३४७ अब्ज डॉलरचा आहे. ट्रम्प यांनी भारतातील जीएसटी या नव्या कर प्रणालीचे कौतुक केले. भारताच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर सुधारणा असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील सहा अणु प्रकल्पांसाठी वेस्टिंगहाउस इलेक्ट्रिक कंपनी आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया यांच्यातील कराराची या दोन्ही नेत्यांना प्रतीक्षा आहे. त्यासोबतच, आरोग्य, अंतराळ क्षेत्र, समुद्री भाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्याचा संकल्प केला. इंधन पुरवठा करण्याबाबत विचार करत असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
चीनचा तीळपापड; ट्रम्प आणि मोदी यांची जवळीक विनाशकारी सिद्ध होऊ शकते-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे अपेक्षेप्रमाणे चीनच्या पोटात गोळा उठला आहे. ट्रम्प आणि मोदी यांची जवळीक विनाशकारी सिद्ध होऊ शकते, असे चीनमधील वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे.
अमेरिका म्हणजे जपान नव्हे याची आठवणही या वृत्तपत्रातून चीनने भारताला करून दिली आहे. चीनचे या सरकारी वृत्तपत्रातील एका लेखात असेही मांडण्यात आले आहे की, अमेरिकेने म्हटले होते की भारत अमेरिकेचा खरा मित्र आहे. यावरुन हे स्पष्ट होत आहे की अमेरिका चीनवर निशाणा साधण्यासाठी नवी दिल्लीचा वापर करणार.
अमेरिकेकडून हा एक सापळा आहे. ज्यात भारताचा केवळ वापर केला जात आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला सुरक्षा परिषदेत स्थान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते प्रत्यक्षात साकारणार नाही, असा टोलाही या लेखात लगावला आहे.

ट्रम्प यांची मुलगी इवांका भारतात येणार मोदींचे निमंत्रण स्वीकारले-
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका यांनी जागतिक उद्योजकतेचे नेतृत्व करण्यासाठी भारतात यावे, हे मोदींचे आमंत्रण तिने स्वीकारले आहे. इवांकाने याबद्दल मोदींचे टिष्ट्वटरवर आभारही मानले.
1.4 लाखांचा ड्रेस-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलिनिया यांनी परिधान केलेला पिवळ्या रंगाचा फुला-फुलांचे प्रिंट असलेला ड्रेस (गाऊन) तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचा असल्याचे कळते. इमिलिओ पुक्की या वेबसाइटवर या ड्रेसची किंमत दर्शवण्यात आलेली आहे. मोदी यांच्या भेटीत पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील मेलिनिया सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
स्टॅम्प, शाल अन् चांदीचे ब्रेसलेट
मोदींनी ट्रम्प यांना अब्राहम लिंकन यांचे छायाचित्र असलेला स्टॅम्प भेट म्हणून दिला. अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर १९६५ साली भारताने त्यांच्या गौरवार्थ त्यांची छबी असलेले पोस्टल स्टॅम्प तयार केले होते.
याशिवाय मोदी यांनी ही जम्मू-काश्मीरमध्ये हाताने विणली जाणारी शालही भेट दिली. मेलिनिया यांना मोदींनी हिमाचल प्रदेशच्या कांगडा भागात तयार करण्यात येणारे चांदीचे ब्रेसलेट भेट दिले. चहा आणि मधही भेट दिल्याचे समजते. 
सुरक्षा परिषदेसाठी पाठिंबा
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी अमेरिका भारताला सहकार्य करणार असल्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. याशिवाय इतर काही संस्थांमध्येही भारताला स्थान देण्याबाबत अमेरिका पाठिंबा देणार आहे. या सहकार्याबाबत मोदी यांनी ट्रम्प यांचे संयुक्त निवेदनात आभारही मानले. 
गार्डियन ड्रोन भारताला विकणार
भारतीय लष्कराची ताकद वाढविणारे गार्डियन ड्रोन विकण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि उपकरणांवर भारतासोबत एकत्र काम करण्यासाठी अमेरिकेने तयारी दर्शविली आहे. 
डोवाल मोदींची मदत करतात... 
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ऐनवेळी मोदींच्या मदतीला धावून आले. मोदी भाषण करत असताना दोनवेळा त्यांच्यासमोरील पाने वाऱ्यामुळे उडून गेली. ती पाने अजित डोवाल यांनी एकत्र करून मोदींकडे परत दिली.
जीएसटीचे कौतुक
भारतात लागू होणाऱ्या जीएसटी या नव्या कररचनेचेही ट्रम्प यांनी कौतुक केले. हा भारताच्या इतिहासातील क्रांतीकारी बदल असेल आणि त्यामुळे भारतातील जनतेलाच फायदा होईल. आम्हीही असेच काही करणार आहोत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या कामकाजाचा ट्रम्प यांनी गौरव केला.

Web Title: India is a true friend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.