Russia : भारत विश्वसनीय सहयोगी, पाकशी मर्यादित सहयोग- रशिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:38 AM2021-04-15T00:38:00+5:302021-04-15T07:53:07+5:30
Russia : रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन यांनी भारत, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर २००३च्या युद्धबंदी कराराचे कठोरपणे पालन करण्याच्या वचनबद्धतेचे स्वागत केले आहे.
नवी दिल्ली : भारत एक विश्वसनीय सहयोगी असून, आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची मतभिन्नता किंवा चुकीच्या संकल्पना नाहीत, असे रशियाने बुधवारी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचबरोबर स्वतंत्र संबंधांच्या आधारावर पाकिस्तानबरोबर सीमित सहयोग आहे, असेही त्या देशाने स्पष्ट केले आहे.
रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन यांनी भारत, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर २००३च्या युद्धबंदी कराराचे कठोरपणे पालन करण्याच्या वचनबद्धतेचे स्वागत केले आहे. दोन्ही देश, तसेच क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहेत, असेही ते म्हणाले.
बाबुश्कीन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत रशियन राजदूत निकोलाई कुदाशेव यांनी पश्चिमी देशांच्या हिंद-प्रशांत रणनीतीवर टीका करताना म्हटले आहे की, हे धोकादायक व शीत युद्धाच्या मानसिकतेतून बाहेर येण्याचा प्रयत्न मानले पाहिजे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर क्षेत्रीय सहमती बनविण्याच्या प्रक्रियेत भारताला सहभागी करून घेतले पाहिजे व अफगाण शांतता प्रक्रियेबाबत नवी दिल्ली, तसेच मास्कोचा दृष्टिकोनसारखाच आहे, असे बाबुश्कीन यांनी म्हटले आहे.
रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांचा भारत दौरा व त्यानंतर त्यांच्या पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत बाबुश्कीन म्हणाले की, पाकिस्तानशी आमचे स्वतंत्र संबध आहेत.
त्यामुळे अन्य कुणाशी असलेल्या संबंधांच्या विरोध म्हणून त्याकडे पाहिले जाऊ नये. यामुळे भारत-रशियात कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या संकल्पना आहेत, असे मानण्याची गरज नाही. भारत-रशिया संबंधांत असे काहीही नाही.
दरम्यान, कुदाशेव यांनी म्हटले आहे की, भारत हा रशियाचा विश्वसनीय सहयोगी आहे व दोन्ही देशांतील संबंध समान, समग्र, सद्भावनापूर्ण, ठोस व भविष्योन्मुखी आहेत. रशियाचे विदेशमंत्री लावरोव यांच्या ६ एप्रिलच्या भारत दौऱ्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, याचा उद्देश या वर्षीच्या उत्तरार्धात होणार असलेल्या भारत-रशिया शिखर चर्चेची तयारी करणे हाच होता.
दहशतवादाच्या विरोधातील लढाई, समान अजेंडा
रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन यांनी म्हटले आहे की, भारत, पाकिस्तान व रशियासह शांघाय सहयोग संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्यात क्षेत्रीय सुरक्षा, दहशतवादाच्या विरोधातील लढाई, इतर धोक्यांच्या मुकाबल्यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहयोग आहे. रशियाचे पाकिस्तानसमवेत भारताच्या तुलनेत मर्यादित संबंध आहेत. तथापि, दहशतवादाच्या विरोधातील लढाई समान अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला दहशतवाद विरोधी उपकरणे व समर्पित अभ्यासात सहयोग करीत आहोत.