दहशतवादाविरोधात एकत्र लढणार भारत-अमेरिका!
By admin | Published: June 28, 2017 02:21 AM2017-06-28T02:21:35+5:302017-06-28T02:23:06+5:30
जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमसारख्यांच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय भारत आणि अमेरिकेने घेतला असून
वॉशिंग्टन : जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमसारख्यांच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय भारत आणि अमेरिकेने घेतला असून, पाकिस्तानने आपली भूमी अशा दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा इशारा दोन्ही देशांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चर्चेनंतर जे संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले, त्यात मुंबईवरील २६/११ चा हल्ला, पठाणकोट हल्ला तसेच अन्य दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही पाकिस्तानला सुनावले आहे.
दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी ट्रम्प व मोदी यांच्यात दहशतवादाच्या मुकाबल्याबाबत एकमत झाल्याचे नमूद केले. पाकिस्तानविषयी विचारता ते म्हणाले की, सीमेपलिकडून काही दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या कारवायांबाबत या निवेदनात पुरेसे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानविषयी आणि त्याने निर्माण केलेल्या समस्यांविषयी तसेच त्या सोडविण्याबाबत दोघा नेत्यांत सविस्तर चर्चा झाली आहे.
दहशतवादाचे केंद्र कुठे आहे, याबाबत दोघांमध्ये एकमत झाले, असे सांगून जयशंकर म्हणाले की केवळ भारतालाच नव्हे, तर अफगाणिस्तानलाही हाच दहशतवाद छळत आहे. दोन देशांतील चर्चेत प्रथमच पाकिस्तानचा इतका स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
अल कायदा, इसिस, जैश-ए-मोहमद, लष्कर-ए-तोयबा आणि डी (दाऊ द) कंपनी तसेच त्यांच्याशी संबंधित अन्य संघटना यांचा दहशतवाद मोडून काढण्यासाठी एकत्र येण्याचे भारत व अमेरिकेने ठरविले आहे.
जगाला असलेला दहशतवादाचा धोका लक्षात घेऊ न, तो संपवण्यासाठी एकत्र यायला हवे, याची चर्चा मोदी व ट्रम्प यांच्यात झाली, असे सांगून परराष्ट्र सचिव म्हणाले की, दोघांच्या भेटीआधीच सय्यद सलाऊद्दिन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून अमेरिकी प्रशासनाने आपण दहशतवादाच्या मुद्द्यावर किती कठोर आहोत, हे दाखवून दिले आहे.
मोदी महान पंतप्रधान-
मोदी महान पंतप्रधान आहेत. माझे त्यांच्यासोबत बोलणे होत असते. मी त्यांच्याविषयी वाचतही असतो. ते अत्यंत चांगले काम करत आहेत, भारताची अनेक बाबतीत प्रगती होत आहे, त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही अमेरिकेत येणे ही सन्मानाची बाब आहे.- डोनाल्ड ट्रम्प
रणनीतीबाबत चर्चा-
मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवाद, संघटना, त्यांच्या कारवाया याविषयीची माहिती एकमेकांना दिली आणि त्याविरुद्ध लढण्यासाठीची रणनीती तयार करण्याच्या दृष्टीने चर्चाही केली.
त्यासाठी गुप्तचरांकडून मिळालेली माहिती, दहशतवाद्यांचे सोशल मीडियावरील नेटवर्क आणि त्यांचा तपास यासाठी एकमेकांना मदत करण्याचे भारत व अमेरिका यांच्यात ठरले आहे, असे व्हाइट हाउसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
भारत सच्चा मित्र!
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूवी मी भारत अमेरिकेचा सच्चा मित्र आहे, असे म्हटले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरही मी ते पुन्हा एकदा अधोरेखीत करू इच्छितो.