डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीने भारत नरमला? मोदी सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:27 IST2025-03-11T17:26:40+5:302025-03-11T17:27:47+5:30
India US Tariff News: भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वादावर केंद्र सरकारने संसदेत महत्वाची माहिती दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीने भारत नरमला? मोदी सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती
India US Tariff News:भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वादावर केंद्र सरकारने संसदेत महत्वाची माहिती दिली. लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, आतापर्यंत अमेरिकेने भारतावर कोणताही परस्पर शुल्क कर लादलेला नाही. भारत आणि अमेरिका एका नवीन व्यापार करारावर चर्चा करत आहेत, ज्यामध्ये दोन्ही देश आयात शुल्क कमी करण्यावर आणि पुरवठा वाढवण्यावर भर देतील. यामुळे दोन्ही देशांना याचा फायदा होईल.
ट्रम्प सरकार 2 एप्रिलपासून शुल्क लागू करणार
केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले होते की, भारताने शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. ट्रम्प म्हणाले होते की, 2 एप्रिल 2025 पासून अमेरिकेपेक्षा जास्त कर आकारणाऱ्या सर्व देशांवर परस्पर शुल्क लागू केले जाईल. भारत आमच्यावर खूप उच्च शुल्क लादतो. तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाही. आमच्यावर जास्त कर लादले, तर आम्हीही कर लादणार, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
दोन्ही देशांची चांगल्या व्यापारासाठी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांनी 2030 पर्यंत परस्पर व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय 2025 च्या अखेरीस व्यापार करारावर वाटाघाटी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. व्यापार धोरणाबाबत मंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, व्यापारात आणखी सुधारणा करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सतत चर्चा सुरू आहे. भारतीय कंपन्या नवीन बाजारपेठा शोधत असून व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
2023 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात एकूण 190.08 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. भारताने 83.77 अब्ज डॉलरच्या वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या, तर 40.12 अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात केली. अशा प्रकारे भारताला 43.65 अब्ज डॉलर्सचा नफा झाला.