Corona Vaccination: २३१ दिवसांत देशवासियांचं लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प; केंद्र सरकारचा ‘बिग प्लॅन’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:32 AM2021-05-15T09:32:10+5:302021-05-15T09:33:22+5:30
प्रौढ लोकांची संख्या ९४ कोटीच्या आसपास आहे. लसीकरण करण्यासाठी वर्षभरातील उर्वरित २३१ दिवसांत १७० कोटी डोस देण्यात येतील.
नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच केंद्र सरकारने कोविड १९ लसीकरणावर भर देण्याचा प्लॅन आखला आहे. सरकारच्या प्लॅननुसार १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लसीच्या डोसचा तुटवडा जुलैपासून दूर होईल. सूत्रांच्य माहितीनुसार डिसेंबर पर्यंत देशातील ९४ कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने आखलं आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारने सांगितले की, ऑगस्ट डिसेंबरच्या दरम्यान देशभरात २०० कोटी डोस उपलब्ध होतील. जे प्रौढ लोकांसाठी पुरेशा प्रमाणात आहे. अवघ्या ७ महिन्यात इतक्या लोकांचं लसीकरण करण्यामागे सरकारचं काय गणित आहे हे जाणून घेऊया. भारतात लसीकरण मोहिमेला १५ जानेवारीपासून सुरूवात झाली. शुक्रवारी या मोहिमेला ४ महिने पूर्ण झालेत. या १२० दिवसांच्या कालावधीत १८ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. म्हणजे सरासरी १५ लाख लोकांना लसीचे डोस दिले आहेत.
अंदाजानुसार, प्रौढ लोकांची संख्या ९४ कोटीच्या आसपास आहे. लसीकरण करण्यासाठी वर्षभरातील उर्वरित २३१ दिवसांत १७० कोटी डोस देण्यात येतील. म्हणजे दिवसाला ७४ लाख लसीकरण होईल. यात सुट्टीचाही समावेश आहे. म्हणजे सरासरीच्या तुलनेत ५ पटीने जास्त डोस दिले जातील. प्रौढ लोकांना लस कशी उपलब्ध होणार? यावर एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, मे मध्ये ८.५० कोटी डोस, जूनमध्ये १० कोटी, जुलै १५ कोटी, ऑगस्ट ३६ कोटी, सप्टेंबर ५० कोटी, ऑक्टोबर ५६ कोटी, नोव्हेंबर ५९ कोटी आणि डिसेंबरमध्ये ६५ कोटी डोस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात ४० टक्के लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. बाकी लवकरच येतील. मे महिन्यातील काही कोटा जूनमध्ये भरून काढण्यात येईल असं ते म्हणाले.
कुठून येणार लसीचे डोस?
रशियात बनलेली स्पूतनिक लसीचे ६० लाख डोस मे महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. जूनमध्ये १ कोटी, जुलै २.५ कोटी तर ऑगस्टमध्ये १.६ कोटी डोस उपलब्ध होतील. ऑगस्टनंतर या लसीच्या डोसचा साठा वेगाने वाढण्याची शक्यता आहे. काही स्थानिक कंपन्या हा डोस तयार करतील. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या लसीचे ७.७ कोटी पेक्षा अधिक डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्डचे साडेसहा कोटी डोस उपलब्ध होतील. जुलैमध्ये ७ कोटी, ऑगस्टमध्ये १० कोटी, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ११.५ कोटी डोस उपलब्ध होण्याचा केंद्र सरकारचा अंदाज आहे.
कोव्हॅक्सिनचे अडीच कोटी डोस जूनमध्ये उपलब्ध होतील. जुलै, ऑगस्टमध्ये ७.५ कोटी, सप्टेंबरमध्ये ७.७ कोटी, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये १०.२ कोटी तर डिसेंबरमध्ये १३.५ कोटी डोस मिळण्याची शक्यता
याशिवाय बायोलॉजिकल, नोवावॅक्स, जेनोवा आणि भारत बायोटेकच्या आंतरराष्ट्रीय लसीचे डोसही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सरकारने सध्या प्री क्लिनिकल ट्रायलमध्ये लसीचा यात समावेश केला नाही.
ऑगस्टपासून दरदिवशी ९० लाख डोस देण्याचा संकल्प
सरकारच्या अंदाजानुसार, जुलैच्या अखेरपर्यंत लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल. म्हणजे अडीच महिन्याच्या लसीकरणाच्या तुलनेत जुलैनंतर वेगाने लसीकरण होईल. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात जे प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यानुसार राज्याला मे मध्ये एकूण ६.१२ कोटी डोस उपलब्ध होतील. मेमध्ये सरासरी दिवसाला २५ लाख डोस दिले जात आहेत. जूनमध्ये सरकार १० कोटी डोस आणि जुलैमध्ये १५ कोटी डोसचा साठा राहण्याचा अंदाज आहे. जर हे अंदाज खरे ठरले तर पुढील ७८ दिवसांत भारतात ३३ कोटी लसीकरण झालेले असेल. त्यानुसार १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरमध्ये १५३ दिवसात १३७ कोटी लसीकरण होईल. म्हणजे दिवसाला ९० लाख लसीचे डोस दिले जातील.