भारताने आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले, ड्रोनच्या मुद्यावरुन चीनचा पुन्हा सनसनाटी आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 12:22 PM2017-12-07T12:22:57+5:302017-12-07T12:33:38+5:30
डोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळलेला असताना चीनने आता भारतावर हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
बिजींग - डोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळलेला असताना चीनने आता भारतावर हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. भारताचे ड्रोन विमान चीनच्या हवाईहद्दीत घुसले होते असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारताने चीनची प्रादेशिक अंखडता आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. आम्हाला भारताची कृती अजिबात पटलेली नाही. आमचा याला ठाम विरोध आहे असे झँग शुली यांच्या हवाल्याने शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
चीनच्या हवाई हद्दीत घुसणारे हे ड्रोन विमान नंतर कोसळले. ही घटना कधी आणि कुठे घडली याबद्दल झँग यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी जबाबदारीने तपास करुन त्या ड्रोनची ओळख पटवली असे झँग यांनी म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यातच भारत आणि चीनने डोकलाममधल्या वादग्रस्त भागातून आपले सैन्य मागे घेतले होते.
70 पेक्षा जास्त दिवस दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा डोकलामध्ये मिळते तिथे चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने हा तणाव निर्माण झाला होता. भारताने यावर तीव्र आक्षेप घेत चीनने सुरु केलेले काम रोखून धरले होते. चीनला या प्रदेशात आडकाठी केली नसती तर भारताचा महत्वाचा पट्टा थेट चीनच्या टप्प्यात येणार होता. जे रणनितीक दृष्टया भारताला अजिबात परवडणारे नव्हते.
डोकलामपासून जवळच चीनने बांधली 400 मीटर उंचीची भिंत
दोन्ही देशांमध्ये डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. डोकलाममधल्या वादग्रस्त भागातून माघार घेऊन चिनी सैन्य 400 मीटर आत गेले असले तरी चीन अजिबात गप्प बसलेला नाही. डोकलामपासून जवळच जिथे चिनी सैनिकांनी तळ ठोकलाय तिथे मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे.
झी न्यूजने गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार डोकलाममधल्या वादग्रस्त भागाच्या मागच्या बाजूला चीनने 400 मीटर उंचीची भिंत उभारली आहे. आपण काय करतोय याची कुणालाही खबर लागू नये यासाठी चीनने ही भिंत बांधली आहे. चीनकडून या भागात मोठया प्रमाणावर बांधकाम सुरु आहे तसेच मोठया संख्येने चिनी सैनिक इथे तैनात करण्यात आले आहेत. सैनिकांना सामावून घेण्यासाठी 16 बराक बांधण्यात आले आहेत. सहा बोगदे बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. चिनी सैन्याच्या 23 ते 27 शेडस असून 200 पेक्षा जास्त तंबू ठोकण्यात आले आहेत.