भारतातच स्वातंत्र्य हवे आहे!
By admin | Published: March 4, 2016 03:44 AM2016-03-04T03:44:44+5:302016-03-04T03:44:44+5:30
भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी
नवी दिल्ली : भारतापासून नव्हे तर, भारतातच स्वातंत्र्य हवे आहे, असे सांंगत कन्हैया याने गुरुवारी रात्री सरकारवर
जोरदार टीकास्त्र सोडले. देशद्रोहाच्या आरोपात अटक असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची गुरुवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर विद्यापीठ परिसरात बोलताना त्याने सरकारला लक्ष्य केले.
कन्हैया म्हणाला की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझे मतभेद आहेत पण, त्यांनी स्मृती इराणींच्या जेएनयू प्रकरणावरील भाषणानंतर सत्यमेव जयते असे जे व्टिट केले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. कारण, हे संविधानातील शब्द आहेत. भारतातील संविधान आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचेही तो म्हणाला. आम्ही अभाविपला शत्रू समजत नाही, कारण आमचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास आहे. आम्ही अभाविपला विरोधी पक्षासारखेच पाहतो. माझी अटक म्हणजे एक सुनियोजित कट असल्याचेही तो म्हणाला. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर मी बोलणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
यावेळी त्याने सरकारवर चौफेर टोलेबाजी केली, तो म्हणाला, मोदीजी मन की बात करतात, पण दुसऱ्यांचे ऐकत नाहीत. जेएनयूविरोधात जीही सत्ता उभी राहिली त्याला आम्ही धडा शिकवला आहे, असे सांगून तो म्हणाला की, लढणारे जबादार नाहीत लढवणारे जबाबदार आहेत. देशातील सरकार हे लोकविरोधी सरकार आहे. आम्हाला भ्रष्टाचारपासून स्वातंत्र्य हवंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे? असा सवालही त्याने केला.