भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?
By admin | Published: September 30, 2016 05:20 AM2016-09-30T05:20:47+5:302016-09-30T05:20:47+5:30
उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढविण्यासाठी पाकशी हवाई संपर्क तोडण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा असून
नवी दिल्ली: उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढविण्यासाठी पाकशी हवाई संपर्क तोडण्याचाही विचार सुरू
असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा असून,एकमेकांना हवाई हद्दींचा वापर करण्याची परवानगीही दिली आहे. हे यापुढे सुरू ठेवायचा की नाही याचा विचार मोदी सरकार करीत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला उभय देशांमधील द्विपक्षीय उड्डयण करार आणि आमच्या हवाई हद्दीतून उडणाऱ्या पाकिस्तानी विमानसेवांबद्दल सविस्तर माहिती मागितली असून यासंदर्भातील अंतिम निर्णय पीएमओ स्तरावरच घेतला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय विमान कंपनी पाकिस्तानात उड्डाणसेवा देत नाही. परंतु पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तानातील विमानसेवांना एकमेकांच्या देशात आठवड्यात २८ वेळा सेवा संचलनाची परवानगी मिळाली आहे. भारताने २००१ साली संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत हवाई संपर्क तोडला होता. त्यावेळी तत्कालीन इंडियन एअरलाईन्सने पाकिस्तानला जाणारी विमाने बंद केली होती. सरकारने पाकिस्तानी एअरलाईन्सलाही भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्यास मज्जाव
केला होता. याच्या प्रत्युत्तरात पाकनेही
भारतीय विमान कंपन्यांवर निर्बंध घातले
होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या निर्णयाने पाकिस्तानपेक्षा भारतीय विमान कंपन्यांचेच अधिक नुकसान होणार आहे. कारण पश्चिमेकडे उड्डाण भरणाऱ्या भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याकरिता लांबचा मार्ग घ्यावा लागेल. त्यामुळे अधिक इंधन खर्च होईल आणि प्रवासाची वेळही वाढेल.