भारत तेरे तुकडे होंगे आदी घोषणांचा JNU मधला व्हिडीओ व्हायरल
By Admin | Published: February 15, 2016 02:00 PM2016-02-15T14:00:57+5:302016-02-15T14:00:57+5:30
या विद्यार्थ्यांच्या भारतविरोधी तसेच अफझल गुरूचे उदात्तीकरण करण्याच्या घोषणांचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये आला आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रविरोधी काय कृती केली यावरून देशभरात वादविवाद झडत असताना, या विद्यार्थ्यांच्या भारतविरोधी तसेच अफझल गुरूचे उदात्तीकरण करण्याच्या घोषणांचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रोहित चहल यांनी हा व्हिडीओ प्रसारीत केला आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी अफजल गुरुच्या समर्थनार्थ घेतलेला कार्यक्रम आणि भारतविरोधी केलेल्या घोषणांमुळे राजकीय वातावरण चांगलच तापलंय. एकीकडे भाजपा विद्यार्थ्यांवर जोरदार टीका करत असताना काही राजकीय पक्षांनी मात्र विद्यार्थ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा विरोध करत आकसापोटी ही कारवाई करत असल्याचा आऱोप केला आहे.
अखिल भारतीय विद्यार्था परिषदेच्या रोहित चहल या नेत्याने जेएनयू विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनाचा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी अफजल गुरुच्या समर्थनार्थ तसंचं भारतविरोधी घोषणा देताना स्पष्ट दिसतायत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा, भारत तेरे टुकड़े होंगे, इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह, अफज़ल हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं, अफज़ल तेरे खून से इन्किलाब आएगा, अशा स्पष्ट ऐकायला मिळत आहेत.
हा व्हिडीयो जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमातलाच आहे का, ज्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तेच यात सहभागी आहेत का आदी बाबींचा खुलासा अद्याप झालेला नाही.
दरम्यान, कन्हय्या कुमार हा देशविरोधी भाषण व घोषणा देत असल्याचा ठोस पुरावा मिळाल्याचा दावा दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केला आहे.