2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त होईल, स्मृती इराणींची राज्यसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 09:08 PM2019-07-04T21:08:11+5:302019-07-04T21:08:21+5:30
आम आदमी पक्षाचे नेते खासदार सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता.
नवी दिल्ली - महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत बोलताना, देशातील कुपोषणासंदर्भात चर्चा केली. तसेच, 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त देश होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक ड्रीम प्रोजेक्टपैकी 'पोषण अभियान योजना' हा एक महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचं उद्दिष्ट असल्याचंही इराणी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं.
आम आदमी पक्षाचे नेते खासदार सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना स्मृती इराणी यांनी पोषण अभियान योजनेसंदर्भात माहिती दिली. जेव्हा आपण कुपोषणाबाबत वाच्यता करतो, तेव्हा सॅनिटेशन, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि इतरही काही फॅक्टर्ससंदर्भात चर्चा केली जाते. पोषण अभियान जलद गतीने कार्यरत होत आहे. त्यामुळे 2022 पर्यंत देशात एकही मुल कुपोषणग्रस्त राहणार नाही. देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे अभियान कार्यरत आहे. पोषण अभियानाची सुरुवात केली, तेव्हा 25 कोटी नागरिक या अभियानासोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर, 8 ते 22 मार्च या कालावधीत पोषण पखवाडा साजरा करण्यात आला. त्यावेळी 44 कोटी 88 लाख लोकांनी सहभागी होत या योजनेला एक आंदोलन बनवल्याचं पाहायला मिळालं. शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या मिड डे मीलसंदर्भात स्मृती यांनी माहिती दिली. शाळेतील मध्यान्य भोजन अधिक चांगल देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य सृदृढ राहिल, असेही स्मृती इराणी यांनी सांगितले.