भारत जागतिक अर्थव्यवस्थेचे ‘इंजिन’, डाव्होसमध्ये जागतिक आर्थिक फोरमवर पंतप्रधान मांडणार विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:18 AM2018-01-22T01:18:32+5:302018-01-22T02:20:16+5:30
जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १३० सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ सोमवारी डाव्होसला (स्वित्झर्लंड) रवाना होत आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील.
नवी दिल्ली : जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १३० सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ सोमवारी डाव्होसला (स्वित्झर्लंड) रवाना होत आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील.
जागतिक आर्थिक फोरमची (डब्ल्यूइएफ) ४८ वी बैठक आल्प्स गिरीशिखरांच्या कुशीत वसलेल्या डाव्होसमधील एका रिसॉर्टमध्ये होत आहे. डब्ल्यूईएफचे अध्यक्ष क्लाऊस श्वॉब हे सोमवारी त्याचे उद्घाटन करतील. मात्र पाच दिवस चालणाºया या परिषदेत पंतप्रधान मंगळवारी विषय मांडतील. त्याआधी सोमवारी सकाळी सहा केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन डाव्होसला रवाना होत आहेत. सोमवारी रात्रीच पंतप्रधान मोदी यांनी विदेशातील ४० कंपन्यांचे सीईओ व २० भारतीय कंपन्याचे सीईओ आणि अध्यक्षांसाठी विशेष मेजवानी डाव्होसमध्ये आयोजित केली आहे. या मेजवानीदरम्यान जागतिक गुंतवणुकीसाठी भारतीय अर्थव्यवस्था खुली असल्याची चर्चा केली जाईल.
मंगळवारी होणा-या मुख्य भाषणात मोदी हे तरुण व आधुनिक भारताचे चित्र मांडणार आहेत. भारतातील उद्योगाभिमूख वातावरणासाठी उचलण्यात आलेली पावले, भ्रष्टाचारावर आणलेला आळा, काळ्या पैशांविरुद्धची मोहिम, कर संरचनेचे सुलभीकरण व यामार्फत विकासाला मिळणारी गती, हा विषय पंतप्रधान मोदी मांडतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
या परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख आणि उद्योजांकसह जगभरातील ३ हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सहभागी होणार आहेत. मात्र मोदी व ट्रम्प हे वेगवेगळ्या दिवशी डाव्होसमध्ये असल्याने त्यंची भेट होणार नाही. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासीही दाखल होणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांची त्यांच्यासोबत कुठलिही बैठक होणार नाही, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. मात्र मोदी हे स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.
भारतीय योगविद्येचे मार्केटिंग-
या परिषदेच्या निमित्ताने भारतीय योगविद्येचे मार्केटींग केले जाणार आहे. सोमवारी रात्री पंतप्रधानांनी आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीवेळी योगविद्याचे सादरीकरण केले जाणार आहे. यासोबतच मेजवानीमध्ये भारतातील विविध खाद्य पदार्थांचा समावेश असेल. डब्ल्यूइएफच्या परिषदेसाी जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एच.डी. देवेगौडा यांच्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान आहेत.