भारत बनेल ‘एआय’ पाॅवरहाउस- ‘एनव्हिडिया’ AI चिप निर्माता कंपनीचे सीईओ जेन्सेंग हुआंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:18 PM2024-10-25T13:18:58+5:302024-10-25T13:19:38+5:30
साॅफ्टवेअर उद्याेगासाठी भारत ‘प्रिय’
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जगभरातील संगणक उद्याेगासाठी भारत ‘प्रिय’ असून, २०२४ मध्ये भारतातील संगणकीय क्षमतेत २० पट वाढ हाेणार आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेेलिजन्स’च्या क्षेत्रातही (एआय) भारत माेठी झेप घेणार असून, साॅफ्टवेअरची निर्यात करणारा भारत लवकरच ‘एआय’ क्षेत्रातील निर्यातीमध्ये आघाडी घेईल, असा दावा ‘एनव्हिडिया’ या एआय चिप निर्माता कंपनीचे सीईओ जेन्सेंग हुआंग यांनी केला.
मुंबईत आयाेजित एआय संमेलनात ते बाेलत हाेते. हुआंग यांनी भारतात एआय तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी एनव्हिडियाच्या कटिबद्धतेवर जाेर देताना सांगितले की, पारंपरिकदृष्ट्या साॅफ्टवेअर निर्यातीचे केंद्र राहिलेला भारत आता बॅक ऑफिस साॅफ्टवेअर उत्पादनांपासून ‘एआय’ विकास आणि वितरणात पाॅवरहाउस हाेण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
भारत जगाला केवळ सीईओ नव्हे तर सर्वाेत्तम एआय देणार : मुकेश अंबानी
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यावेळी ‘एनव्हिडीया’च्या भागीदारने भारतात ‘एआय काॅम्प्युटिंग’चा पाया उभारणार असल्याचे जाहीर केले. एआय संमेलनात अंबानी आणि हुआंग यांनी भारतातील एआयच्या विकासाबाबत तसेच देश या क्षेत्रात एक जागतिक नेतृत्व म्हणून उभे राहत असल्याबाबत चर्चा केली. अंबानी म्हणाले की, भारत एका बुद्धिमत्तेच्या युगाच्या उंबरठ्यावर आहे. येणाऱ्या काळात गाेपनीयतेच्या उद्याेगात भारत जगाला चकित करणार आहे. एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे लाेकांच्या आकांक्षा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे. भारत जगाला केवळ सीईओ नव्हे तर सर्वाेत्तम ‘एआय’देखील देणार आहे.
‘एआय काेणाच्या नाेकऱ्या नाही घेणार’
‘एआय’मुळे नाेकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झालेल्या चिंतेबाबत हुआंग यांनी सांगितले की, एआय नाेकऱ्यांना पूर्णपणे संपविणार नाही. मात्र, काम करण्याच्या पद्धतीत माेठे बदल घडवून आणेल. जाे चांगले काम करण्यासाठी एआयचा वापर करेल, ताे दुसऱ्याची नाेकरी हिरावून घेईल, असे हुआंग म्हणाले.
‘एआय करणार वाहतूक नियंत्रण’
वाहतूक नियंत्रण तसेच नियम मोडणाऱ्यांना दंड लावण्यासाठी एआयचा वापर करण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत गुरुवारी दिली.