"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 10:14 PM2024-10-04T22:14:32+5:302024-10-04T22:16:42+5:30

"देशातील 25 कोटी लोकंना गरिबीतून बाहेर काढले; 140 कोटी भारतीय आमची ताकद"

"India will become world's third largest economy through reform, perform and transform" says narendra modi | "रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी

"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी

PM Narendra Modi : "देशात प्रचंड बदल होतोय, आपण आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर आहोत. आर्थिक सुधारणांद्वारे सरकारने केवळ व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण केले नाही, तर सुमारे 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे", असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते शुक्रवारी(4 ऑक्टोबर) कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

140 कोटी भारतीय आमची ताकद 
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "लवकरच भारतात 5 सेमीकंडक्टर प्लांट असतील. आपण सेमीकंडक्टर चिप्स भारतात बनवून संपूर्ण जगाला पुरवू. या मेड इन इंडिया चिप्सचा भारतासह संपूर्ण जगाला फायदा होईल. सर्व प्रकारच्या धोरणात्मक सुधारणा करून भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्ण लाभ देत आहोत. 40 हजारांहून अधिक नियमांमध्ये बदल करून आम्ही कंपनी कायदा व्यावसायिकांच्या हिताचा बनवला आहे. 140 कोटी भारतीय हीच आमची ताकद आहे, आम्ही भारताच्या भल्यासाठी अधिक संरचनात्मक सुधारणा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत."

जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था...
"भारताच्या आर्थिक प्रगतीसोबत सर्वांना बरोबर घेऊन जात आहोत. याचाच परिणाम म्हणजे, गेल्या 10 वर्षात जवळपास 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. आम्ही सुधारणांच्या मार्गावर पुढे जात राहू. आमचे सरकार सुधारणा आणि परिवर्तन करणारे आहे. आम्ही देशाला वेगाने पुढे नेत राहू. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज भारताचा जीडीपी जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल", असा दावा पीएम मोदींनी यावेळी केला.

2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचे ध्येय
मोदी पुढे म्हणतात, "'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' या तत्त्वावर सातत्याने निर्णय घेऊन सरकार देशाला वेगाने पुढे नेत आहे. केंद्र सरकार सातत्याने सुधारणांचा पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहे. भारतामध्ये आर्थिक वाढीसोबतच समावेशालाही चालना दिली जात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.आज भारत हे जगातील गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. हे गेल्या 10 वर्षांत केलेल्या सुधारणांमुळे आहे. सरकार 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनण्यास मदत करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे."

आज जगाचा भारतावर विश्वास आहे
"मजबूत पायावर आधारित शाश्वत उच्च विकासाच्या मार्गावर भारत अव्वल स्थानावर राहण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. आज संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 81 व्या क्रमांकावरून 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. आम्ही संशोधनाला प्रोत्साहन देत आहोत. भारत हा दुचाकी आणि ट्रॅक्टरचा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. पूर्वी आपण मोबाईल फोन आयात करायचो, पण आज भारतात 33 कोटींहून अधिक मोबाईल फोन बनवले जात आहेत. आज जागतिक आणीबाणीच्या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा देश बनला आहे", असेही मोदी यावेळी म्हणाले. 
 

Web Title: "India will become world's third largest economy through reform, perform and transform" says narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.