भारत रशियाचा उपग्रह प्रक्षेपणाचा विक्रम मोडणार ?
By Admin | Published: June 22, 2016 03:13 PM2016-06-22T15:13:59+5:302016-06-22T15:13:59+5:30
एकाचवेळी वीस उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करुन भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने बुधवारी नवा अध्याय लिहीला.
ऑनलाइन लोकमत
एकाचवेळी वीस उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करुन भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने बुधवारी नवा अध्याय लिहीला. अवकाश संशोधनाच्या वेगवेगळया विभागात विक्रम रचणारे इस्त्रोचे वैज्ञानिक एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर करण्याचा रशियाचा विक्रम मोडणार का ? याची आता उत्सुक्ता लागली आहे.
नजीक भविष्यात असा विक्रम करण्याची इस्त्रोची योजना दिसत नसली तरी, इस्त्रोने ठरवले तर ते या विक्रमाला सुद्धा गवसणी घालू शकतात. कारण इस्त्रोने यापूर्वीच्या सर्व अवघड मोहिमा पहिल्या प्रयत्नात यशस्वी करुन जागतिक अवकाश संशोधनात स्वत:ची एक विश्वासहर्ता निर्माण केली आहे.
चांद्रयान - १, मंगळ मोहीम ही त्याची उदहारणे आहे. अमेरिका, रशिया या अवकाश संशोधनात प्रगत असलेल्या देशांना मंगळ मोहिमेमध्ये अनेक प्रयत्नानंतर यश मिळाले. इस्त्रोने मंगळाच्या कक्षेत पोहोचण्याची कामगिरी पहिल्याच प्रयत्नात करुन दाखवली.
उपग्रह प्रक्षेपणाचा विश्वविक्रम
रशियाने २०१४ साली डीएइपीआर रॉकेटमधून एकाचवेळी ३७ उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करुन उपग्रह प्रक्षेपणाचा जागतिक विक्रम रचला.
त्याआधीर अमेरिकन अवकाश संस्था नासाच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. नासाने २०१३ मध्ये एकाचवेळी २९ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.
इस्त्रोकडे यापूर्वी २००८ मध्ये एकाचवेळी १० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा अनुभव होता. या सर्व उपग्रहांचे वजन ८२४ किलो होते. यात आठ परदेशी आणि दोन भारतीय उपग्रह होते.
रशियाने २००७ मध्ये एकाचवेळी १६ उपग्रह प्रक्षेपित केले होते. पण त्यांचे वजन पण त्यांचे वजन भारताच्या दहा उपग्रहांपेक्षा कमी होते.
भारताचे प्रक्षेपण, दिशादर्शन, वैज्ञानिक संशोधन आणि वातावरणाचा अभ्यास करणारे एकूण ३५ उपग्रह सध्या अवकाशात आहेत. भारताला ही संख्या दुप्पट करायची आहे.
भारताने १९६३ साली पहिले रॉकेट अवकाशात पाठवले आणि १९७५ साली पहिला उपग्रह अवकाशात पाठवला.
२००९ मध्ये भारताच्या मानवरहीत चांद्रयान -१ मोहिमेने चंद्रावर पाण्याचे अंश शोधले.