Corona Vaccination: शर्यत संपता संपेना! 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण करतोय खरे, पण दुसरा डोस देण्यात खूप मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:35 PM2021-10-19T21:35:14+5:302021-10-19T21:36:08+5:30
Corona Vaccination 100 crore dose: केंद्राने राज्यांना आजवर 102 कोटी कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत. यापैकी 10.42 कोटी डोस शिल्लक आहेत. यात बहुतांश डोस हे पहिले आहेत.
पुढील दोन-तीन दिवसांत भारत कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) 100 कोटींचा टप्पा पूर्ण करणार आहे. हा एक मैलाचा दगड आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण कोणत्याच देशाला शक्यही नाही आणि झालेले देखील नाही. यामुळे भारतासाठी ही एक मोठी गोष्ट असणार आहे. परंतू हे करत असताना मोठ्या संख्येने दुसरा डोस न मिळालेले आहेत. यावर केंद्र सरकारला आता लक्ष द्यावे लागणार आहे.
भारताला लोकसंख्येच्या मानाने जवळपास 180 कोटींच्या आसपास कोरोना लसींची गरज आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सोमवारी राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांमधील कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी पहिला डोस बहुतांश जणांना मिळालेला आहे, आता दुसरा डोस देण्याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचना दिल्या आहेत.
काही राज्यांनी पहिला आणि दुसरा डोस देण्याचे लक्ष्य साधले आहे. या राज्यांची लोकसंख्या कमी आहे. परंतू अनेक राज्ये अशी आहेत ज्यांनी पहिला डोस देण्याकडे लक्ष दिले आहे. त्यांनी आता दुसरा डोसदेखील या नागरिकांना मिळेल याची तयारी करावी, असे ते म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणावर लसीकरण झाले आहे त्यावर लक्ष देवून लसीकरण मोहिमेला गती द्यावी. ग्रामीण भागावर जागृती करावी, दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे, असे राजेश भूषण यांनी राज्यांना सूचना केल्या आहेत.
केंद्राने राज्यांना आजवर 102 कोटी कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत. यापैकी 10.42 कोटी डोस शिल्लक आहेत. आजवर 99 कोटी डोस देण्यात आले आहेत. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या 74 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 30 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यामुळे पहिल्या डोससाठी 25 टक्के लोकसंख्या आणि दुसऱ्या डोससाठी 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या वाट पाहत असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.