भारत शाेधणार समुद्रातील खजिना! चंद्रयान, सूर्ययानानंतर आता सागरयान, ‘मत्स ६०००’ पाणबुडी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 06:39 AM2023-11-11T06:39:05+5:302023-11-11T07:04:26+5:30
चेन्नईच्या राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था ‘एनआयओटी’ने मत्स्य-६००० पाणबुडी विकसित केली आहे.
नवी दिल्ली : चंद्रावर भारताचा झेंडा फडकाविल्यानंतर आता देशातील शास्त्रज्ञ समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताने ‘समुद्रयान’ माेहिम आखली असून स्वदेश बनावटीची ‘मत्स्य ६०००’ ही खास पाणबुडी समुद्रात खाेलवर पाठविण्यात येणार आहे. या यानाची पहिली चाचणी वर्ष २०२४च्या सुरूवातीला बंगालच्या उपसागरात चेन्नईजवळ हाेणार आहे. त्यानंतर दाेन वर्षांनी २०२६मध्ये माेहिम प्रत्यक्ष लाॅंच हाेणार आहे.
चेन्नईच्या राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था ‘एनआयओटी’ने मत्स्य-६००० पाणबुडी विकसित केली आहे. ही एक खाेल समुद्रातील माेहिम असून ‘ब्ल्यू इकाॅनाॅमी’ विकसित करण्याच्या दृष्टीकाेनातून विकसित हाेत आहे.
समुद्राच्या पाेटात काय काय?
खाेल समुद्रात वायू, पाॅलिमेटलिक मॅंगनीज नाेड्यूल, हायड्राे थर्मल सल्फाईड, निकेल व काेबाल्ट यासारखे बहुमूल्य खनिजांचा शाेध घेण्यासाठी यान पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कमी तापमान असलेल्या मिथेनचाही शाेध घेण्यात येईल.
भारतासह १४ देशांनाच परवानगी
संयुक्त राष्ट्राने खाेल समुद्रात संशाेधनासाठी भारतासह केवळ १४ देशांना परवानगी दिली आहे. त्यात अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनीच मानवसहित चाचण्यास सक्षम असलेली पाणबुडी विकसित केली आहे.
‘मत्स्य’चे वैशिष्ट्य काय?
- २.१ मीटर व्यास असलेली गाेलाकार पाणबुडी.
- ८० मिलीमीटर जाड टायटेनियम मिश्र धातूचा वापर.
- ही पाणबुडी समुद्रात ६,००० मीटर खाेलवर जाण्यास सक्षम आहे.
- समुद्रपातळीपेक्षा ६०० पट दाब सहन करू शकते.
- १२-६ तास विनाथांबा काम करू शकते.
- ९६ तास पुरेल एवढा प्राणवायू असेल.
- ३ शास्त्रज्ञांना समुद्रात नेणार.