देशाला मिळणार 3 नवीन IIM, 20 केंद्रीय विद्यालय आणि 4 IIT-IIS, पीएम मोदी करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 05:39 PM2024-02-19T17:39:18+5:302024-02-19T17:39:53+5:30
PM Modi Will Inaugurate 20 New KV: जम्मू-काश्मीरमध्ये बांधलेल्या भव्य एम्स रुग्णालयाचे उद्घाटनदेखील केले जाणार आहे.
PM Modi will inaugurate IIT IIS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून देशभरात केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शिक्षण आणि कौशल्यावर आधारित पायाभूत सुविधांच्या वाढीचा कल 2024 मध्येही पाहायला मिळतोय. या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान मोदी उद्या(दि.20) सूमारे 13,375 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
या प्रकल्पांमध्ये IIT भिलाई, IIT तिरुपती, IIT जम्मू, IIITDM कांचीपुरमचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) कानपूर आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे दोन कॅम्पस - देवप्रयाग (उत्तराखंड) आणि आगरतळा (त्रिपुरा) येथे उभारले जाणार आहेत. यासोबतच तीन नवीन IIM चे उद्घाटनदेखील होईल. यात IIM जम्मू, IIM बोधगया आणि IIM विशाखापट्टणमचा समावेश आहे. याशिवाय, देशभरात केंद्रीय विद्यालय (KV) साठी 20 नवीन इमारती आणि 13 नवीन नवोदय विद्यालय (NV) इमारतींचे उद्घाटनदेखील पार पडणार आहे.
जम्मू-काश्मीरसाठी खास सुविधा
जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)चे, विजयपूर (सांबा), जम्मू येथे उद्घाटन करतील. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांनी त्याची पायाभरणी केली होती. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना' या योजनेंतर्गत त्याची स्थापना केली गेली आहे.
227 एकर क्षेत्रावर पसरलेल्या एम्ससाठी 1,660 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. हे रुग्णालय 720 खाटांनी सुसज्ज असेल. याशिवाय 125 जागांचे वैद्यकीय महाविद्यालय, 60 जागांचे एक नर्सिंग महाविद्यालय, 30 खाटांसह एक आयुष ब्लॉक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी निवास व्यवस्था, UG आणि PG विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निवास आणि इतर सुविधांनी सुसज्ज असेल.