भारताला मिळणार ५१० एकर जमीन
By admin | Published: May 8, 2015 01:20 AM2015-05-08T01:20:47+5:302015-05-08T01:20:47+5:30
भारत आणि बांगलादेश यांच्यातील काही वस्त्या आणि भूभागाचे आदानप्रदान करण्याला मुभा देणाऱ्या ऐतिहासिक घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेने आज सर्वसंमतीने मंजुरी दिली.
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील काही वस्त्या आणि भूभागाचे आदानप्रदान करण्याला मुभा देणाऱ्या ऐतिहासिक घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेने आज सर्वसंमतीने मंजुरी दिली.
विधेयक पारित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आसनांकडे जात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, बीजदचे भर्तृहरी महताब, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय व अन्य सदस्यांचे आभार मानले. दरम्यान, यामुळे बांगलादेशातील सुमारे ५१० एकर जमीन भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारताची वर्तणूक शेजारी देशांमध्ये दहशत पसरवणाऱ्या ‘बिग ब्रदर’ सारखी नव्हे, तर ‘एल्डर ब्रदर’ (थोरला भाऊ) सारखी आहे, असे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. सीमा विधेयकाच्या रूपाने संसदेने ११९ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली.
सीमा विधेयक आकाराला येण्यामागे इंदिरा- मुजीब करार ते मनमोहन- शेख हसीना प्रोटोकॉलला श्रेय देत स्वराज यांनी राजकीय पक्षभेद बाजूला सारला.
राज्यसभेने बुधवारी सर्वसंमतीने मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी लोकसभेने तोच मार्ग अनुसरला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)