भारताला याकूबच्या फाशीचे परिणाम भोगावे लागतील - छोटा शकीलची धमकी
By Admin | Published: July 31, 2015 09:17 AM2015-07-31T09:17:57+5:302015-08-01T11:20:15+5:30
भारताला याकूब मेमनच्या फाशीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलने दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - मुंबईतील १९९३ साली झालेल्या बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनला काल फाशी देण्यात आली आणि बाँबस्फोटातील बळींना अंशत: न्याय मिळाल्याची भावना व्यक्त झाली. मात्र भारताला याकूबच्या फाशीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलने दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधत शकीलने मोदी सरकारला ही धमकी दिली आहे.
'भारताने एका निर्दोष व्यक्तीली शिक्षा दिली आहे. याप्रकरणाशी याकूबचा काहीही संबंध नव्हता, त्याने आत्मसमर्पण केलं होतं. मात्र तरीही भारताने त्याचा विश्वासघात करत त्याला फासावर लटकवलं. त्यामुळे भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी शकीलने दिली. 'जर त्यावेळी दाऊदही भारतात आला असता तर त्याचाही असाच छळ झाला असता म्हणूनच तो भारतात पला नाही' असेही शकील म्हणाला.
'याकूब हा गुन्हेगार नव्हता, त्याच्या भावाने ( टायगर मेमन) केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप याकूबवर लावण्यात आला होता, पण ते खरे नव्हते. भारताने त्याचा विश्वासघात केला, या कृत्यामुळे जगात काय संदेश गेला आहे? त्यामुळे आता 'डी' कंपनी किंवा इतर कोणत्याही गँगमधील व्यक्ती भारत सरकारच्या आश्वासनांना बळी पडणार नाही की कोणत्याही ऑफर्सचा विचार करणार नाही. भारताने याकूबचा कायदेशीर खून केला आहे असे सांगत या विश्वासघाताचे भारताला फार गंभीर परिणाम भोगावे लागतील या धमकीचा पुनरुच्चार शकीलने केला.