भारताला किंमत मोजावी लागेल, चीनचा इशारा
By admin | Published: April 5, 2017 02:38 PM2017-04-05T14:38:52+5:302017-04-05T14:41:18+5:30
दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश दौरा चीनच्या चांगलाचा जिव्हारी लागला असून, चीनने यासाठी भारतावर कडवट शब्दात टीकेचे आसू़ड ओढले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश दौरा चीनच्या चांगलाचा जिव्हारी लागला असून, चीनने यासाठी भारतावर कडवट शब्दात टीकेचे आसू़ड ओढले आहेत. दलाई लामांच्या अरुणाचल दौ-याबद्दल भारताकडे राजनैतिक निषेध नोंदवणार असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने आमच्या चिंतांकडे दुर्लक्ष केले.
भारताने अरुणाचलमध्ये पूर्वेकडच्या वादग्रस्त प्रदेशात दलाई लामा यांना परवानी देऊन आमच्या हिताला धक्का पोहोचवला आहे. याचा भारत-चीन संबंधांवर परिणाम होऊ शकतो असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले. 81 वर्षीय दलाई लामा यांच्या नऊ दिवसाच्या अरुणाचल दौ-याला कालपासून सुरुवात झाली आहे. पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बॉमडीला येथे दलाई लामा आहेत.
अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. दलाई लामा अरुणाचलमध्ये आले तर, भारत-चीन संबंध बिघडतील असा इशारा याआधीही चीनने दिला होता. दरम्यान दलाई लामा यांनी काही जण मला राक्षस समजत असतील तरी माझी काही हरकत नाही अशी चीनच्या आक्षेपावर प्रतिक्रिय दिली.
भारतानेही आमच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप करु नका असे चीनला बजावले आहे. भारत चीनच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्याप्रमाणे चीनने सुद्धा भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करु नये असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेजन रिजीजू यांनी सांगितले. दलाई लामा धार्मिक गुरु असून भारतात त्यांचा प्रचंड आदर केला जातो. त्यांच्याभोवती कुठलाही कृत्रिम वाद निर्माण करु नये असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.