अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 05:16 AM2024-10-13T05:16:29+5:302024-10-13T05:17:21+5:30
५२ उपग्रहांच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने नुकतीच मंजुरी दिली.
नवी दिल्ली : भारत अंतराळातून टेहळणी करण्यासाठी ५२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. चीन, पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम हे उपग्रह करतील तसेच त्यामुळे भारतीय लष्कराच्या संरक्षण सिद्धतेतही वाढ होणार आहे. ५२ उपग्रहांच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने नुकतीच मंजुरी दिली.
सूत्रांनी सांगितले की, सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने ७ ऑक्टोबर रोजी स्पेस बेसड् सर्व्हिलन्स (एसबीएस-३) कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याला ७ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली. सर्व उपग्रहांचे काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या आधारे चालणार आहे. ३६ हजार किमी उंचीवर हे उपग्रह परस्परात संवाद साधतील. (वृत्तसंस्था)
असे आहेत तीन टप्पे
- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने स्पेस बेसड् सर्व्हिलन्स (एसबीएस) मोहिमेला २००१ साली सुरुवात केली होती.
- एसबीएस-१ मोहिमेद्वारे २००१मध्ये चार उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. नंतर एसबीएस-२ मोहिमेच्या अंतर्गत २०१३ मध्ये सहा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. आता एसबीएस मोहिमेचा तिसरा टप्पा अंमलात येणार आहे.