भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार नाही; २०३६ मध्ये लोकसंख्या १५२ कोटींवर राहील स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:09 PM2022-02-11T12:09:45+5:302022-02-11T12:11:03+5:30
भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणना आयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : लोकसंख्येच्या स्फोटाच्या दिशेने भारताची वाटचाल नाही. याउलट राज्यांतील लोकसंख्येतील वाढ सातत्याने घटत आहे. लोकसंख्या वाढीचा कल स्थिरीकरणाकडे असून २०३६ मध्ये भारताची लोकसंख्या १५२.२० कोटीपर्यंत वाढेल, असे सरकारने अधिकृतपणे सांगितले.
भारत आणि राज्यांतील लोकसंख्येचा अंदाज (२०११-३६ ) या शीर्षकाखालील तज्ज्ञ गटाच्या अहवालानुसार २०११च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१.१० कोटींवरून २०३६ मध्ये १५२.२० कोटींपर्यंत जाईल. लोकसंख्या राष्ट्रीय आयोगाने हा अहवाल तयार केला आहे. समृद्धशाली राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.५ आहे; परंतु, हरियाणातील लोकसंख्या वाढीचा दर मात्र २०.१ असून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हा दर १४.४ आहे. तथापि, उत्तर प्रदेशात हा दर २५.४, बिहार २५.८, आसाम २१, झारखंड २२.३, मध्य प्रदेशात २४.५ आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्या वाढीचा दर १४.९ वर आला आहे.
देशात जन्मदरातही घट -
- भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणना
आयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे.
- महाराष्ट्रातील स्थूल जन्मदर (सीबीआर) राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी म्हणजे १५.३ असून गोव्यातील जन्मदर १२.३ आहे.
- ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी महाराष्ट्रासह २६ राज्यांतील लोकसंख्या वाढीत मोठी घट होत असून ही मोठी समाधानाची बाब आहे.